
आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. या चित्रपटाने ४०० कोटी रुपयांचा टप्पा पार करून नवीन विक्रम केला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना, रणवीर सिंग यांचे या चित्रपटातील जबरदस्त अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

धुरंधर हा चित्रपट पाहण्यासाठी सध्या सर्वच थिएटर हाऊसफुल झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण धुरंधर किंवा इतर चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमधली कोणती सीट योग्य याबद्दल आज जाणून घेणार आहोत.

तुम्ही कितीही मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट पाहायला जा, पण जर तुमची सीट चुकीची असेल तर तुमचा सगळा उत्साह मातीमोल होऊ शकतो. चित्रपटाचा खरा फील घेण्यासाठी केवळ पडदा मोठा असून चालत नाही, तर तुमची बसण्याची जागा देखील योग्य असावी लागते.

तुम्ही जर स्क्रीनच्या अगदी जवळ किंवा अगदी लांब कोपऱ्यात बसत असाल, तर तुम्हाला चित्रपटाला योग्य आनंद घेता येत नाही. थिएटरमध्ये सीट निवडण्यामागे एक तांत्रिक गणित दडलेले असते. ज्याला आपण २/३ चा नियम असे म्हणतो.

अनेकदा मागच्या सीट फुल्ल असल्या की आपण पुढच्या सीट बुक करतो. पण स्क्रीनच्या अगदी जवळ बसल्यामुळे आपल्याला पूर्ण पडदा पाहण्यासाठी मान सतत इकडून तिकडे हलवावी लागते. यामुळे मानेच्या स्नायूंवर ताण येतो आणि डोळ्यांनाही त्रास होतो.

काही लोकांना अगदी शेवटच्या रांगेत बसायला आवडते. पण तिथून स्क्रीन लहान दिसते. तसेच, काही वेळा थिएटरचे स्पीकर अशा प्रकारे सेट केलेले असतात की त्यांचा आवाज मध्यभागापर्यंत चांगला येतो. अगदी मागे तो थोडा घुमल्यासारखा वाटतो.

काही लोक कोपऱ्यातील सीट बूक करतात. पण ही सीट बूक करणं कटाक्षाने टाळावे. कोपऱ्यात बसल्यामुळे आपल्याला स्क्रीन तिरपी दिसते. त्यामुळे चित्रपटातील दृश्यांचा जो मूळ आकार असतो, तो नीट दिसत नाही.

थिएटरमध्ये स्क्रीनपासून मागच्या भिंतीपर्यंतचे जे अंतर असते, त्याचे दोन तृतीयांश अंतर हे चित्रपट पाहण्यासाठी सर्वात भारी असते. सोप्या भाषेत सांगायचे तर जर एखाद्या हॉलमध्ये एकूण १५ रांगा असतील, तर तुम्ही ९ व्या किंवा १० व्या रांगेतील सीट बूक करा.

या रांगेत बसताना सुद्धा अगदी कडेला न बसता, बरोबर मधली सीट निवडा. इथून साऊंड तुमच्या दोन्ही कानांवर सारख्या प्रमाणात पडतो. तसेच तुम्ही संपूर्ण स्क्रीन एका नजरेत पाहू शकता.

सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनिअर्सच्या मते, जेव्हा तुमची नजर पडद्याच्या मध्यभागाशी बरोबर समांतर असते, तेव्हा मेंदूला दृश्ये समजून घेण्यास सोपे जाते आणि तुम्ही चित्रपटाचा आनंद जास्त चांगल्या प्रकारे घेऊ शकता.

त्यामुळे जर तुम्ही 'धुरंधर' किंवा इतर कोणत्याही चित्रपटाचे तिकीट बुक करत असाल तर ते २/३ च्या नियमाप्रमाणे करा. यामुळे तुम्ही रांगेच्या मधोमध आणि स्क्रीनपासून योग्य अंतरावर बसून चित्रपट पाहू शकता.

सर्व फोटो - pexel.com/ अक्षय खन्ना -इन्स्टाग्राम