
सातारा कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अवकाळी मान्सूनपूर्व संततधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे ओझर्डे धबधबा वाहू लागला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात मे महिन्यात पहिल्यांदाच हा धबधबा प्रवाहित झाला आहे.

साताऱ्यातील कोयनानगरपासून 8 किलोमीटर अंतरावर नवजा गावजवळ ओझर्डे धबधबा आहे. हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत असतो. कोयना परिसरात पडत असलेल्या पावसामुळे पर्यटक मे महिन्यातच या धबधब्याकडे येत आहे. रविवारीच्या सुट्टीमुळे या भागात पर्यटकांची गर्दी झाली.

ओझर्डे धबधबा जून-जुलै महिन्यात भरपूर पावसानंतर ओसंडून वाहत असतो. परंतु यंदा मे महिन्यातच हा धबधबा प्रवाहीत झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील निसर्गप्रेमींमध्ये आनंद पसरला आहे.

ओझर्डे धबधब्याच्या परिसरात स्काय वॉकची योजना आहे. या प्रकल्पामुळे पर्यटकांना धबधब्याचे मनमुराद सौंदर्य अनुभवता येणार आहे. तसेच कोयना परिसरातील निसर्गाची अनुभूती सर्व पर्यटकांना घेता येणार आहे.

साताऱ्यात पडत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. नदी नाल्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे. पावसामुळे धुळवाफ पेरण्यांसह पेरणीपूर्व मशागतीची कामे राखडली आहे. जून, जुलै सारखा जिरवणीचा पाऊस पडत असल्याने पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांना वेळ मिळणार नाही.