
सकाळची सुरुवात जर निरोगी सवयींनी झाली, तर संपूर्ण दिवस ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरलेला असतो. आपल्या भारतीय परंपरांमध्ये अशा अनेक छोट्या-छोट्या सवयी आहेत, ज्या केवळ शरीराला निरोगी ठेवत नाहीत तर रोगांपासूनही संरक्षण करतात. यापैकीच एक सवय आहे रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून सकाळी रिकाम्या पोटी पिणे. तुम्ही तुमच्या आजी-आजोबांना सकाळी उठून तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा सल्ला देताना ऐकले असेल. आता, आरोग्य तज्ज्ञही याचे महत्त्व समजावून सांगत आहेत. चला जाणून घेऊया याचे फायदे आणि कोणत्या चुका करु नयेत...

जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर ही पद्धत तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तांबे शरीरात लोहाचे (आयरन) चांगले शोषण करण्यास मदत करते, ज्यामुळे हिमोग्लोबिन सुधारते आणि थकवा दूर होतो.

थायरॉइडच्या रुग्णांसाठी हे पाणी फायदेशीर आहे. तांबे थायरॉइड हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करते आणि चयापचय (मेटाबॉलिझम) योग्य राखते.

जर तुमचे केस वेळेआधीच पांढरे होत असतील, तर तुम्ही रोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करू शकता. तांबे मेलॅनिन तयार करण्यास मदत करते, जे केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवते. म्हणजेच तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याने केस वेळेआधी पांढरे होणे थांबू शकते.

याशिवाय जर तुमचे पचन बिघडलेले असेल, तर रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तांब्यामध्ये हलके जंतुनाशक (अँटी-बॅक्टेरियल) गुणधर्म असतात, जे पोट निरोगी ठेवतात आणि गॅस व अपचनाच्या समस्या कमी करतात.

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, तुम्ही ज्या भांड्यातून पाणी पिता, त्यात कधीही आंबट पदार्थ जसे की लिंबूपाणी, व्हिनेगर, चिंच, टोमॅटोचा रस इत्यादी ठेवू नये.

याशिवाय तांब्याच्या भांड्यात दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थही ठेवू नयेत. रोज तांब्याच्या भांड्याला लिंबू आणि मिठाने स्वच्छ करावे आणि नीट वाळवूनच वापरावे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने पाणी प्यावे)