
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात तणाव कमी करण्यासाठी, पार्टीत मजा करण्यासाठी किंवा एकटेपणात वेळ घालवण्यासाठी अनेक जण दारू पिण्याकडे वळतात. मद्यपान ही अनेकांच्या दिनचर्येचा भाग बनली आहे. मात्र, या सवयीचे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम फार कमी लोक गांभीर्याने घेतात. दारु जास्त प्रमाणात प्यायल्यामुळे शरीरातील कोणते व्हिटॅमिन कमी होते चला जाणून घेऊया...

जेव्हा शरीरात अल्कोहोलचे प्रमाण वाढते, तेव्हा सर्वात आधी आणि सर्वात जास्त कमतरता निर्माण होते ती म्हणजे व्हिटॅमिन बी१ (Vitamin B1) ची. याला थायमिन (Thiamine) असेही म्हणतात.

व्हिटॅमिन बी१ शरीरासाठी महत्त्वाचे आहे. कारण, हे अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मज्जातंतूंच्या (नर्व्ह सिस्टम) योग्य कार्यासाठी ते आवश्यक आहे. तसेच मेंदूला निरोगी आणि कार्यक्षम ठेवण्यास मदत करते.

दारूच्या सेवनामुळे थायमिनची कमतरता निर्माण होते. कारण जास्त दारू पिणारे लोक बहुतेक वेळा संतुलित आहार घेत नाहीत. त्यांच्या जेवणात व्हिटॅमिन्स आणि खनिजे पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. तसेच अल्कोहोल आतड्यांमध्ये थायमिनचे शोषण थांबवते. म्हणजे तुम्ही चांगला आहार घेतला तरी हे व्हिटॅमिन शरीरात नीट शोषले जात नाही. तसेच दारूमुळे यकृतावर प्रचंड ताण येतो. यकृत हे थायमिन साठवण्याचे आणि वापरण्याचे मुख्य केंद्र आहे. यकृताची कार्यक्षमता कमी झाल्याने व्हिटॅमिनची कमतरता वाढते.

व्हिटॅमिन बी१ च्या कमतरतेचे शरीरावर गंभीर परिणाम होता. दीर्घकाळ थायमिनची कमतरता राहिल्यास मज्जातंतूंवर गंभीर परिणाम होतात. यातून दोन जीवघेणे विकार उद्भवू शकतात. वर्निके एन्सेफॅलोपॅथी (Wernicke’s Encephalopathy): यात गोंधळ, डोळ्यांच्या हालचालीत अडथळा आणि शरीराचा तोल सांभाळण्यात त्रास होतो. तसेच कॉर्साकॉफ सायकोसिस (Korsakoff’s Psychosis): यात स्मरणशक्तीचा मोठा ऱ्हास होतो, नवीन गोष्टी लक्षात ठेवणे कठीण होते आणि कधीकधी खोट्या आठवणी निर्माण होतात.

दारूचे व्यसन केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत धोकादायक आहे. जर तुमच्या जवळच्या व्यक्तीला मद्यपानाची सवय असेल, तर त्यांना संतुलित आहार घेण्यास आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्यास प्रोत्साहित करा. लवकर लक्ष दिल्यास या गंभीर समस्यांना रोखता येऊ शकते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच कोणालाही दारु पिण्यास प्रोत्साहन देत नाही)