
दारू प्रेमींना सतत दारूविषयी जाणून घेण्यात उत्सुकता असते. मग दारू कशापासून बनते तिथपासून ते दारूच्या किंमती होत असलेले चढ-उतार हे सर्व जाणून घ्यायचे असते. एक अशी देखील दारु आहे जी अप्रत्यक्षपणे ज्वालामुखीच्या राखेपासून बनवली जाते. आता ही दारु कोणती असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

आम्ही दारू विषयी बोलत आहोत तिचे नाव टकीला आहे. दारू प्रेमींसाठी टकीला हे नाव परिचित आहे, पण त्याबद्दल फारशी माहिती अनेकांना नसते. आपल्या तीक्ष्ण चवीसाठी आणि अनोख्या इतिहासासाठी प्रसिद्ध असलेली ही दारू उत्तर अमेरिकेतील मेक्सिको देशाच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. जगभरातील कोट्यवधी लोकांना टकीला पिण्याची आवड आहे आणि ते त्याचे चाहते आहेत. विशेष म्हणजे, 1918 च्या स्पॅनिश फ्लू महामारीदरम्यान डॉक्टरांनी लोकांना टकीला पिण्याचा सल्ला दिला होता. त्यांचा विश्वास होता की, टकीलाला मीठ आणि लिंबूसोबत घेतल्यास फ्लूची लक्षणे कमी होऊ शकतात.

टकीला ही निळ्या एगेव वनस्पतीपासून बनवलेली एक डिस्टिल्ड पेय आहे. एगेव ही लिली जमातीची वनस्पती आहे आणि ती मोठ्या एलोव्हेरासारखी दिसते. या वनस्पतीच्या टोकांना टोकदार काटे असतात. हे पेय शतकानुशतके प्रचलित आहे. त्याची निर्मिती प्रक्रिया आजही बऱ्याच अंशी पारंपरिक आहे.

अझ्टेक लोकांनी सर्वप्रथम एगेव वनस्पतीपासून ‘पुल्क’ नावाचं पेय बनवलं. हे पेय एगेवच्या रसाला आंबवून तयार केलं जायचं आणि त्याचा उपयोग धार्मिक व विधींसाठी केला जायचा. जेव्हा स्पॅनिश लोकांनी मेक्सिकोवर विजय मिळवला आणि तिथे स्थायिक झाले, तेव्हा त्यांनी पुल्कचा स्वतःचा प्रकार बनवायला सुरुवात केली, ज्याला त्यांनी ‘मेज्काल’ असं नाव दिलं.

मेज्काल देखील एगेवच्या रसापासूनच बनवलं जायचं, परंतु ते डिस्टिल केलं जायचं. मेक्सिकोमध्ये स्थायिक झालेल्या स्पॅनिश लोकांमध्ये हे पेय लवकरच लोकप्रिय झालं. टकीलाचं उत्पादन सर्वप्रथम 16व्या शतकात जलिस्को राज्यातील टकीला नावाच्या गावात सुरू झालं. पहिली टकीला डिस्टिलरी अल्टामिरा येथील मार्क्विस यांनी स्थापन केली होती. टकीला मूळतः एका खास प्रकारच्या एगेवपासून बनवली जाते, ज्याला ब्लू वेबर एगेव (एगेव अझुल) म्हणतात. आजही टकीला बनवण्यासाठी याच प्रकारच्या एगेवचा वापर केला जातो.

टकीला बनवण्यासाठी ब्लू वेबर एगेवचा वापर केला जातो. ही वनस्पती मेक्सिकोच्या जलिस्कोच्या उंच भागात वाढते. या भागातील हवामान आणि माती ब्लू एगेवच्या लागवडीसाठी उत्तम आहे. ही वनस्पती विशेष आहे, कारण ती जलिस्को आणि आजूबाजूच्या परिसरातील सिलिकेटयुक्त लाल ज्वालामुखीय मातीमध्ये वाढते. त्यामुळे अनेकदा टकीला बनवण्यासाठी ज्वालामुखीच्या राखेचाही वापर होतो असे म्हटले जाते.

टकीला बनवण्यासाठी दरवर्षी 300 दशलक्षांहून अधिक एगेव वनस्पतींची कापणी केली जाते. निळ्या एगेवला परिपक्व होण्यासाठी सुमारे 8 ते 10 वर्षे लागतात. जमिनीखाली, ही वनस्पती एक मोठा कंद तयार करते, ज्याला ‘पिना’ म्हणतात. हा कंद मोठ्या सुपारीसारखा दिसतो. पिनाच्या पानांना कापल्यानंतर त्याची कापणी केली जाते. कापणीनंतर पिनाला डिस्टिलरीत नेलं जातं, जिथे ते शिजवलं आणि आंबवलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)