
दिवाळीचा सण जवळ येताच सगळे जण घरी, गावी जाण्यासाठी उत्सुक असतात, त्यातले बहुताांश लोक हे ट्रेनचा वापर करतात. दिवाळीच्या काळात रेल्वे स्थानकांवर गर्दी होते आणि ट्रेन तिकिटांची मागणी गगनाला भिडते.

दिवाळीला लोक अनेकदा फटाके घरी घेऊन जातात, परंतु रेल्वे कायद्याच्या कलम 164 अंतर्गत ट्रेनमध्ये ज्वलनशील गोष्टी, वस्तू घेऊन जाणे हा गंभीर गुन्हा आहे. गॅस सिलिंडर, रसायने , फटाके किंवा पेट्रोल-डिझेलसारख्या वस्तू घेऊन जाण्यासही मनाई आहे. जर तुम्ही पकडले गेलात तर तुम्हाला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.

रेल्वे कायद्याच्या कलम 167 अंतर्गत ट्रेनमध्ये धूम्रपान अर्थात स्मोकिंग करणं हा गुन्हा आहे. सिगारेट किंवा बिडी ओढल्यास दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये प्रवाशांना तात्काळ अटक देखील केली जाते.

तिकिटाशिवाय ट्रेनमध्ये चढणे किंवा बनावट तिकीट खरेदी करणे हा कलम 137 अंतर्गत गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये, प्रवाशांकडून भाड्याच्या 10 पट जास्त शुल्क आकारले जाऊ शकते आणि तुरुंगवास देखील होऊ शकतो. सणासुदीच्या काळात तर तिकीट तपासणी अधिक कडक असते.

सणांच्या काळात, लोक अनेकदा इतर प्रवाशांच्या जागा ताब्यात घेतात किंवा जबरदस्तीने त्या जागी बसतात. कलम 155 आणि 156 अंतर्गत हा दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये, रेल्वे पोलिस (RPF) तात्काळ कारवाई करू शकतात. या घटनेत सहभागी असलेल्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागू शकते.

रेल्वे कायद्याच्या कलम 145 नुसार, ट्रेनमधील इतर प्रवाशांना त्रास देणारे कोणतेही वर्तन गुन्हा मानले जाते. यामध्ये मोबाईल फोनवर मोठ्याने बोलणे, मोठ्याने संगीत वाजवणे किंवा अनावश्यक आवाज करणे, अशा गोष्टींचाही समाविष्ट आहे.

कलम 145 अंतर्गत, मद्यधुंद अवस्थेत ट्रेनमध्ये चढणे, ओरडणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवाशांना त्रास देणे हा देखील गुन्हा आहे. असे करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब अटक करून तुरुंगात पाठवले जाते.

कलम 141 अंतर्गत ट्रेनची साखळी विनाकारण ओढणे हा गुन्हा मानला जातो. असे करताना पकडल्या गेलेल्या कोणालाही एक वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 1000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. ही चूक अनेकदा सणाच्या गर्दीच्या काळात मस्करी म्हणून केली जाते परंतु त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.