32 वर्षांपूर्वाचं अश्लील गाणं, ज्याचे शब्द होते डबल मिनिंग, दूरदर्शनने केलं होतं बॅन, पण आज प्रचंड लोकप्रिय, वाजताच प्रत्येकजण गुणगुणतो
32 वर्षांपूर्वीचं हे गाणं ठरलं होतं प्रचंड वादग्रस्त. ज्याचे शब्द होते डबल मिनिंग. दूरदर्शनने घातली होती बंदी. पण आजही ते गाणं प्रचंड लोकप्रिय.

चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी एकाच क्षेत्रात मर्यादित न राहता विविध क्षेत्रांत यश मिळवले आहे. अशाच बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख म्हणजे इला अरुण.

राजस्थानी लोकसंगीतातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत त्यांनी बॉलिवूडमध्ये गायिका आणि अभिनेत्री म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

15 मार्च 1954 रोजी राजस्थानातील जोधपूर येथे जन्मलेल्या इला अरुण यांनी आपल्या खास, दमदार आवाजामुळे 90 च्या दशकात मोठी लोकप्रियता मिळवली. त्यांचे सर्वात गाजलेले गाणे म्हणजे 'चोली के पीछे क्या है' जे 1993 साली प्रदर्शित झालेल्या खलनायक या चित्रपटातील आहे.

हे गाणे त्यांनी अल्का याग्निक यांच्यासोबत गायले होते आणि ते माधुरी दीक्षितवर चित्रित करण्यात आले होते. या गाण्यासाठी इला अरुण यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. मात्र, हे गाणे वादग्रस्त ठरले होते. ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याच्या बोलांवर अश्लीलतेचे आरोप झाले.

काही ठिकाणी हे गाणे न गाण्याची मागणी करण्यात आली तर दूरदर्शन नेही या गाण्यावर बंदी घातली होती. तरीही इला अरुण यांनी कायमच आपल्या गाण्यांचे समर्थन करत हे लोकसंस्कृती आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शवणारे असल्याचे सांगितले. वाद असूनही हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले आणि आजही विविध कार्यक्रमांमध्ये ऐकायला मिळते.