
भारतीय संविधानाचे शिल्पकार, नॉलेज ऑफ सिम्बॉल, बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील एक महान युगपुरुष होते. त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत. एक द्रष्टा नेता म्हणूनही बाबासाहेबांची ओळख होती. या देशाची नस न् नस माहीत असलेले ते नेते होते. आपण त्यांची जयंती साजरी करताना त्यांच्या बद्दलच्या काही गोष्टी आपल्याला माहीत असायलाच हव्यात.

बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोकणातील आंबडवे हे होते. त्यांचं मूळ आडनाव सकपाळ होतं. पूर्वीच्या काळी आपल्या गावाच्या नावावरून आडनाव ठेवत असत. कोकणात तर गावाचं नाव घेऊन त्या मागे कर हा शब्द लावण्याची पद्धत होती. सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये बाबासाहेबांचे नाव टाकण्यात आले. त्यावेळी बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ यांनी बाबासाहेबांचं नाव शाळेत नोंदवताना भीमराव रामजी आंबडवेकर असं ठेवलं.

7 नोव्हेंबर 1900 मध्ये बाबासाहेबांच्या आडनावांची नोंद सकपाळ ऐवजी आंबडवेकर अशी करण्यात आली. आंबडवे गावाच्या नावावरून नाव ठेवून त्यामागे कर हा शब्द लावण्यात आला होता.

विशेष म्हणजे बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनावही याच शाळेत मिळाले. त्यांचे शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी बाबासाहेबांना हे आडनाव दिलं. बाबासाहेबांचं आंबवडेकर हे आडनाव किचकट होतं. त्यामुळे त्यांनी आपलं आंबेडकर हे सुटसुटीत आडनाव बाबासाहेबांना दिलं.

लहानपणी बाबासाहेबांचे नाव भीमा/भिवा असे होते. “भिवा रामजी आंबेडकर” अशी स्वाक्षरी असलेले ते रजिस्टर शाळेने आजही जपून आणि लॅमिनेशन करुन ठेवले आहे. अभ्यागतांसाठी झेरॉक्स केलेल्या स्वरूपातील प्रत तयार केलेली आहे.

आंबेडकर गुरुजी मंगळवार पेठेतील व्यंकटपुरात राहत. बाबासाहेब मजूर मंत्री झाले, तेव्हा गुरुजींना भेटण्यासाठी साताऱ्याला व्यंकटपुरातील घरी गेले होते. कृष्णाजी आंबेडकर गुरुजींची तिसरी पिढी आज कार्यरत आहे.