
आपल्या दिवसाच्या खाण्याची सुरुवात सकाळच्या नाश्तापासून होते. सकाळचा नाश्ता प्रत्येकासाठी महत्त्वाचा भाग असतो. पण आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक नाश्त्यात ब्रेड खाणे पसंत करतात.

व्हाईट ब्रेड, ब्राऊन बेड आणि मल्टीग्रेन ब्रेड असे ब्रेडचे अनेक प्रकार असतात. या प्रत्येकाचे स्वतःचे फायदे असले तरी रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्याने काय होते, त्याचा खरंच फायदा होतो का, याबद्दल आपण जाणून घेऊया.

ब्रेडमध्ये, विशेषतः पांढऱ्या ब्रेडमध्ये, फायबरचे प्रमाण कमी असते. यामुळे पचनसंस्था कमकुवत होऊ शकते. ब्रेड खाल्ल्याने मेटाबॉलिझ्म प्रक्रिया मंदावते. त्यामुळे तुमच्या शरीरात अन्न आतड्यांमध्ये जमा होऊ शकते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या उद्भवू शकतात.

व्हाईट ब्रेडमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) खूप जास्त असतो. याचा अर्थ ब्रेड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. साखरेची पातळी वारंवार वाढल्याने टाइप २ मधुमेहाचा (Type 2 diabetes) धोका वाढू शकतो.

तसेच उच्च ग्लायसेमिक इंडेक्समुळे लगेच भूक लागते आणि यामुळे जास्त खाण्याची इच्छा निर्माण होते. याचाच परिणाम तुमच्या वजनावर होऊन वजन वाढू शकते. व्हाईट ब्रेडमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. सकाळी रिकाम्या पोटी जास्त सोडियम असलेले अन्न खाल्ल्यास पोट फुगणे आणि पचनाच्या इतर समस्या येऊ शकतात.

जर तुम्हाला ब्रेड खाणे टाळायचे असेल, तर तुम्ही नाश्त्यासाठी ओट्स, अंडी, फळे, भाज्या हे पदार्थ खाऊ शकता. यात तुम्हाला फायबर, प्रोटीन आणि भरपूर विटामिन्स, मिनरल्स मिळतात. यामुळे तुमचे पोट भरलेले राहते.

तुम्ही नाश्ता नेहमी पौष्टिक आणि पचायला सोपा असावा, असाच करा. जर तुम्हाला ब्रेड खायचाच असेल, तर तो कमी प्रमाणात आणि काहीतरी खाल्ल्यानंतर खाणे योग्य ठरु शकते.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)