तुम्हीही रील्स बघत जेवता का? मग होऊ शकतात हे आजार, वेळीच सावध व्हा!

जेवताना मोबाईल स्क्रीन पाहणे हे आरोग्यासाठी स्लो पॉईजन ठरत आहे. यामुळे मुलांमध्ये अपचन, लठ्ठपणा आणि चिडचिडेपणा वाढतोय. या गंभीर समस्येवर आयुर्वेद व विज्ञान काय सांगते, जाणून घ्या.

| Updated on: May 20, 2026 | 3:53 PM
1 / 8
हल्लीच्या डिजीटल युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आजकाल स्मार्टफोनशिवाय जगणे अशक्य वाटू लागले आहे. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले डोळे स्क्रीनवर खिळलेले असतात.

हल्लीच्या डिजीटल युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आजकाल स्मार्टफोनशिवाय जगणे अशक्य वाटू लागले आहे. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले डोळे स्क्रीनवर खिळलेले असतात.

2 / 8

आता हे स्मार्टफोनचे व्यसन थेट आपल्या डायनिंग टेबलपर्यंत पोहोचले आहे. जेवताना मोबाईल पाहणे ही केवळ एक वाईट सवय नसून शरीरासाठी ते एका स्लो पॉईजनप्रमाणे (Slow Poison) काम करते, असा इशारा आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानाने दिला आहे.

3 / 8

आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीत आणि आयुर्वेदात अन्नाला पूर्णब्रह्म म्हणजेच एक पवित्र साधना मानले गेले आहे. शांत आणि आनंदी मनाने खाल्लेले अन्न शरीराला अमृतासारखे लाभ देते. परंतु, जेवताना इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब व्हिडिओ किंवा गेमिंगमध्ये मन गुंतले की, मेंदू आणि शरीराचा संपर्क तुटतो. परिणामी, तेच अन्न शरीरासाठी घातक ठरू लागते.

4 / 8

आजकाल लहान मुलांमध्ये ही समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. समोर मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीन असल्याशिवाय मुले जेवायला तयारच होत नाहीत. आपण ताटात वाढलेली कोणती भाजी, डाळ किंवा पोळी खात आहोत, याचेही भान त्यांना नसते. अन्नाची चव, सुगंध आणि रंग यांचा आस्वाद न घेता केवळ यांत्रिकपणे तोंड चालवण्याची ही सवय मुलांच्या आरोग्याशी खेळत आहे.

5 / 8

जेव्हा आपला मेंदू स्क्रीनवर व्यस्त असतो, तेव्हा तो पोटाला पाचक रस (Enzymes and Acids) तयार करण्याचे संकेत देऊ शकत नाही. यामुळे पचनक्रिया मंदावते. तसेच, स्क्रीनकडे बघत असताना अन्न नीट चावून खाल्ले जात नाही, ज्यामुळे पोटाला दुप्पट मेहनत करावी लागते. याच कारणामुळे गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी यांसारख्या समस्या कायमच्या मागे लागतात.

6 / 8

आपले पोट भरल्यावर मेंदू पोट भरल्याचा संदेश पाठवतो. पण मोबाईलमध्ये मग्न असल्यामुळे हा संदेश मेंदूपर्यंत पोहोचतच नाही. यामुळे मुले किंवा मोठे व्यक्ती एकतर भुकेपेक्षा जास्त खातात किंवा व्हिडिओच्या नादात अर्धपोटीच उठतात. विचार न करता खाल्लेले हे अन्न शरीरात चरबीच्या रूपात साठते, जे भविष्यात लठ्ठपणा, मधुमेह आणि हाय कोलेस्ट्रॉलसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरते.

7 / 8

त्यामुळे जेवणाची वेळ ही मनाला शांतता देणारी असायला हवी. मात्र, सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे मेंदू सतत हायपर-अ‍ॅक्टिव्ह राहतो. यामुळे सतत मानसिक थकवा, निद्रानाश आणि चिडचिडेपणा वाढतो. स्क्रीन बघत जेवणारी मुले अधिक हट्टी आणि रागीट बनतात, असे समोर आले आहे.

8 / 8

जर तुमच्याही घरात असे होत असेल तर जेवताना नो मोबाईल फोन अशी सवय सक्तीने लावा. जेवताना कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसा. दिवसभरातील चांगल्या गोष्टींवर चर्चा करा, ज्यामुळे नातेसंबंध घट्ट होतील आणि मोबाईलची आठवण येणार नाही. जेवताना प्रत्येक घास मनापासून, चव घेत आणि चावून खाण्याची सवय स्वतःला व मुलांना लावा.

Follow Us