
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसासाठी दरेगावी आले आहेत. राजकारणातून वेळ काढून ते शेतातील कामांमध्ये व्यस्त झाले आहे. त्यांनी शेतात जाऊन मशागतीचे काम केले. हळदी या पिकाची मशागत त्यांनी मशीनच्या सहाय्याने केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गावी आलो की पाय शेतीकडे वळतात. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेती आणि मातीशी माझे कनेक्शन आहे. शेती करताना मला वेगळा आनंद होतो. जेव्हा, जेव्हा मी गावी येतो, तेव्हा तेव्हा शेतीची कामे करण्यासाठी मी वेळ काढतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतात बांबूची २० हजार रोपे लावली आहे. सातारा जिल्ह्यात १० हजार हेक्टरवर बांबूची लागवड करण्याचे लक्ष केले गेले आहे. बांबूपासून मोठ्या प्रमाणावर इतर बायप्रोडक्ट होतात. बांबूपासून इथेनॉल करता येते. कागद बनवता येतो. यामुळे बांबू लागवडीस राज्यात प्रोत्साहन दिले जात आहे.

बांबू लागवडीचा मोठा प्रकल्प राज्यभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतली आहे. बांबूपासून ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर मिळतो. एका व्यक्तीस लागणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा जास्त वायू बांबू देतो. सर्वच दृष्टीने बांबू लागवड फायदेशीर असल्यामुळे हा प्रकल्प घेतला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी शेतीसाठी खूप मेहनत घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यालाही शेतीची आवड आहे. आपल्या भागातील लोकांची शेती अधिक चांगली कशी होईल, यावर खासदार श्रीकांत शिंदे यांचा भर असल्याचे त्यांनी म्हटले.