
कडाक्याच्या हिवाळ्यात अंघोळीसाठी गरम पाणी मिळावे म्हणून घराघरांत इलेक्ट्रिक गिझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, गिझरचा वापर करताना होणारी छोटीशी चूक किंवा तांत्रिक बिघाड भीषण अपघाताला निमंत्रण देऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी एका नवविवाहित महिलेचा गिझर फुटल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे गिझरच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.

गिझरच्या आत पाणी गरम होत असताना हवेचा दाब निर्माण होतो. जर हा दाब मर्यादेबाहेर गेला, तर गिझरचा भीषण स्फोट होतो. सुदैवाने, गिझर फुटण्यापूर्वी काही विशिष्ट संकेत देतो. हे संकेत ओळखून तुम्ही संभाव्य धोका टाळू शकता.

जर तुमच्या इलेक्ट्रिक गिझरमधून अचानक शिट्टीसारखा किंवा काहीतरी आदळल्यासारखा मोठा आवाज येऊ लागला, तर समजावे की आत पाण्याचा दाब प्रचंड वाढला आहे. अशा वेळी त्वरित गिझर बंद करावा.

प्रत्येक गिझरमध्ये सुरक्षिततेसाठी एक 'सेफ्टी व्हॉल्व्ह' असतो. जर या व्हॉल्व्हमधून वारंवार पाणी गळत असेल तर ते आत उच्च दाब निर्माण झाल्याचे लक्षण असते. हा दाब बाहेर पडायला जागा न मिळाल्यास गिझर फुटण्याची शक्यता असते.

गिझरचे तापमान सामान्य सेट केलेले असतानाही जर पाणी खूप जास्त गरम येत असेल, तर याचा अर्थ गिझरचा थर्मोस्टॅट निकामी झाला आहे. थर्मोस्टॅट बिघडल्यामुळे पाणी गरम होण्याची प्रक्रिया थांबत नाही, परिणामी दाबाचे रूपांतर स्फोटात होऊ शकते.

गिझरच्या बाहेरील भागावर गंज चढला असेल किंवा बॉडीला फुगीरपणा (बुडबुडे) आला असेल, तर ते गिझर कमकुवत झाल्याचे लक्षण आहे. अशा स्थितीत अंतर्गत दाब सहन करण्याची क्षमता संपलेली असते.

दरवर्षी थंडी सुरू होण्यापूर्वी तज्ज्ञ मेकॅनिककडून गिझरची सर्व्हिसिंग करून घ्या. नेहमी ISI मार्क असलेलेच गिझर आणि सुटे भाग खरेदी करा. पाणी गरम झाल्यानंतर गिझर त्वरित बंद करा; तो जास्त वेळ सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते.