
विदर्भातील वाशीम जिल्हा हा पारंपरिक पिकांसाठी ओळखला जातो. मात्र, शेलू खडसे येथील प्रयोगशील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांनी पारंपरिक पिकाला छेद देत नारळाची यशस्वी शेती करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

रमेश धाडसे यांनी सहज प्रयोग म्हणून आधी नारळाची ६० झाडे शेताच्या बांधाने लावली. आणि त्यांना चांगले यश आले. त्यानंतर त्यांनी ३३ गुंठे जागेत आणखी अडीचशे नारळांचे कलमे लावली आहेत. वाशिम जिल्ह्यातील हा पहिलाच असा प्रयोग मानला जात आहे.

कोकण विभागात वातावरण नारळासाठी पोषक मानले जाते, मात्र वाशिमसारख्या कोरडवाहू हवामानातही नारळ शेती शक्य आहे, हे रमेश धामोडे यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवले आहे.

धामोडे यांनी सुरवातीला ६० झाडांच्या लागवडीपासून आपल्या प्रयोगाला सुरुवात केली. शेताच्या बांधावर लावलेली झाडं त्यांनी योग्य पद्धतीने वाढवली. या झाडांची नियमित देखभाल आणि पाणीपुरवठा यामुळे झाडांची वाढ जोमाने झाली.लागवडीनंतर त्यांना सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं.

या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी एक एकर क्षेत्रात आणखी ५०० झाडांची लागवड केली. सध्या ही झाडं सुमारे तीन वर्षांची झाली असून, पुढील दोन वर्षांत उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. या झाडांपासून सुमारे ६ लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळेल, असा विश्वास धामोडे यांनी व्यक्त केला आहे.

धामोडे यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे पारंपरिक शेतीच्या पलीकडेही विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवे मार्ग खुलं होत असल्याचं चित्र दिसत आहे.कोकणातील पिकं आता विदर्भातही फुलताना दिसत असून, प्रयोगशीलतेतूनच शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं, याचं उदाहरण म्हणजे रमेश धामोडे यांची नारळ शेती आहे.