
यवतमाळ जिल्ह्यातील एकांबा गावातील पाच मजूर महिला आणि त्यांच्यासोबत दोन छोटी मुले तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे गेल्या काही दिवसापासून कापूस वेचणीसाठी गेली होती. आज या महिला तेलंगणामधून रेल्वेने सहस्त्रकुंड रेल्वे स्थानकावर उतरल्या होत्या.

सहस्त्रकुंड रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर या महिलांनी नदीच्या पुलावरून जाण्याऐवजी नदीपात्रात पाणी कमी असल्याने नदीतून जाण्याचा निर्णय घेतला.

मात्र पैनगंगा नदीपात्राच्या वरील बंधाऱ्यातून पाणी सोडल्याने अचानक नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला.त्यामुळे या महिला आणि दोन लहान मुले नदीच्या पात्रात अडकून पडली.

या पाच महिला आणि दोन मुले सहस्त्रकुंड धबधबा येथे अडकून पडल्याने प्रशासनाने धाव घेतली. त्यानंतर या महिलांना आणि दोन लहान मुलांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणा कामाला लागली.

स्थानिक मच्छीमार आणि पोलिसांच्या मदतीने मोठ्या कौशल्याने नदीपात्राच्या मधोमध अडकलेल्या पाच महिला आणि दोन मुलांची अखेर सुखरूपपणे सुटका करण्यात आली.