
महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आता परदेशातही गणेशोत्सवाची धूम पहायला मिळत आहे.

जर्मनीतील वोल्सबुर्ग येथे स्थायिक असलेले रागळवार कुटुंब दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत असतं. यंदाही या कुटुंबीत मोठ्या उत्साहात गणपतीचे आगमन झाले आहे.

यावर्षी रागळवार कुटुंबाने आपल्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांवरील देखावा तयार केला आहे. युनेस्कोने अलिडेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सात किल्ले जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहेत, त्यातून या कुटूंबाला प्रेरणा मिळाली.

रागळवार कुटुंबाने रायरेश्वरा मंदिरातील शपथविधी, रायगडावरील राज्याभिषेक, खजिना, मावळे, जगदंबा मंदिर, व महाल अशा अनेक प्रसंगांचा देखावा तयार केला आहे. या देखाव्यासाठी घरातील विविध वस्तूंचा वापर करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना सौ. सुगंधा व पंकज रागळवार यांनी सांगितले की, दरवर्षी प्रमाणे यंदाही गौरी गणपती सोहळा आनंद व उत्साहाने साजरे करायचे हे निश्चित होते. काही काळापूर्वी Unesco ने छत्रपती शिवाजी महाराजांचे सात गड किल्ले World Heritage Sites म्हणून घोषित केले. त्यामुळे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज हा विषय घेवून सजावट करण्याचे ठरवले.