
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि पराक्रमाला आदरांजली वाहण्यासाठी वाशीमच्या श्री महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

मंडळाने युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या स्वराज्यातील १२ गड-किल्ल्यांचा भव्य देखावा साकारला आहे. या देखाव्यामुळे शिवकालीन इतिहासाचे दर्शन घडत आहे. त्यामुळे नागरिकांना आणि विशेषतः युवा पिढीला स्वराज्याच्या निर्मितीचा थरार अनुभवता येत आहे.

या मंडपात प्रवेश करताच प्रेक्षकांना जणू काही शिवकाळातच आल्याचा अनुभव येतो. या देखाव्यामध्ये किल्ल्यांची वास्तुरचना, तोफा, भक्कम तटबंदी आणि रणशिंग हुबेहुब साकारण्यात आला आहे.

या मंडळाने प्रत्येक किल्ल्याच्या प्रतिकृतीमधून शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि दूरदृष्टी स्पष्ट होते. या देखाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ किल्ल्यांच्या प्रतिकृतीच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घटनांची मांडणीही करण्यात आली आहे.

यामुळे प्रेक्षकांना स्वराज्याच्या उभारणीचा संपूर्ण प्रवास एकाच ठिकाणी पाहायला मिळतो. हा अप्रतिम देखावा पाहण्यासाठी विद्यार्थी, नागरिक आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.

या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे आणि संस्कृतीचे दर्शन होत आहे. हे पाहून खूप आनंद झाला." असे एका नागरिकांनी म्हटले. मंडळाच्या सर्व नागरिकांना या स्वराज्याच्या प्रतिकृतीचा अनुभव घेण्यासाठी आवाहन केले आहे.