
सोनी मराठी वाहिनीवरील नवनाथांची कथा उलगडून दाखविणारी 'गाथा नवनाथांची' ही पौराणिक मालिका लवकरच 900 भागांचा टप्पा पार करणार आहे. यामध्ये आतापर्यंत नवनाथांपैकी सात नाथांचा अवतार, त्यांचा प्रवास आणि लीला हे सर्व दाखवण्यात आलं आहे.

सध्या नागनाथांचा प्रवास आणि त्यांचे चमत्कार प्रेक्षक भक्तांना पाहायला मिळत आहेत. मालिकेत एकीकडे नाथांचा नकारात्मक गोष्टींविरुद्ध लढा सुरू आहे तर दुसरीकडे नागनाथ आणि भर्तरीनाथ यांचावर होणारे संस्कार पाहायला मिळत आहेत.

आता या मालिकेत प्रेक्षकांना अक्काबाई ही नकारात्मक व्यक्तिरेखा पहायला मिळणार आहे. अक्काबाई ही नाथांविरोधात उभी राहणार असून नाथांच्या पुढील कार्यात ती अडथळा निर्माण करणार आहे.

अक्काबाईच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी सोनाली पाटील आता नव्या भूमिकेत येणार आहे. गाथा नवनाथांची मालिकेतून अक्काबाई हे पात्र ती साकारणार आहे.

अक्काबाईच्या येण्याने नाथांच्या पुढील कार्यात मोठे अडथळे निर्माण होणार आहेत. अक्काबाई ही अघोरी स्त्री आहे. ती गावकऱ्यांना आपल्या बाजूला करून घेणार आहे आणि नाथांच्या विरुद्ध कट रचणार आहे. त्यामुळे नाथांच्या कार्यात नक्कीच अडथळे निर्माण होतील.