झणझणीत कट आणि कुरकुरीत फरसाण! घरच्या घरी अशी बनवा अस्सल गावरान स्टाईल मिसळ
मटकीची उसळ, झणझणीत कट, कुरकुरीत फरसाण आणि गरम पाव यांची जोडी म्हणजे मिसळप्रेमींसाठी खास मेजवानी. जाणून घ्या घरच्या घरी गावरान स्टाईल मिसळ बनवण्याची सोपी रेसिपी.

गावरान स्टाईल झणझणीत मिसळ हा महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. जो त्याच्या तिखट आणि मसालेदार रश्यासाठी ओळखला जातो. चला तर मग जाणून घेऊयात ही जीभेला पाणी आणणारी झणझणीत मिसळ कशी करावी
साहित्य : 2 वाट्या मटकी, कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या,लसूण पाकळ्या, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग,अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल, आवश्यकतेनुसार पाणी
कटासाठी : 1 कांदा, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा मिसळ मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, चिमूटभर हिंग, मीठ, 2 ते 3 चमचे तेल, 2 वाट्या पाणी
मिसळ सजवण्यासाठी : फरसाण, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबाच्या फोडी, पाव
मटकी धुवून 8 तास पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी पाणी काढून मोड काढा.मोड आलेली मटकी कुकरमध्ये हळद, मीठ घालून शिजवा.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी,जिरे आणि हिंगाची फोडणी द्या. त्यात ठेचलेला लसूण आणि मिरच्या घाला. लसूण परतला की चिरलेला कांदा घाला.
कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. त्यात टोमॅटो,हळद,मिसळ मसाला आणि मीठ घाला. टोमॅटो मऊ झाला की शिजवलेली मटकी घाला. थोडं पाणी घालून उसळ काही मिनिटं चांगली उकळू द्या.
आता मिसळीचा महत्त्वाचा भाग म्हणजे कट. कढईत तेल गरम करून त्यात कांदा आणि लसूण परतून घ्या. कांदा मऊ झाला की लाल तिखट,मिसळ मसाला, गरम मसाला , हिंग आणि मीठ घाला. पाणी टाकून कट चांगला उकळू द्या.
आता मिसळ वाढवण्याची वेळ. एका बाऊलमध्ये आधी गरमागरम उसळ घाला. त्यावर भरपूर फरसाण पसरवा. त्यावर झणझणीत कट ओता. शेवटी बारीक कांदा आणि कोथिंबीर घाला.
सोबत लिंबाची फोड आणि गरम पाव. लिंबू पिळलं, पाव कटात बुडवला आणि पहिला घास घेतला की कानातून धूर आला पाहिजे.