
Pasta Origin : पास्ता हा जगातील सर्वात प्रिय पदार्थांपैकी एक आहे, अनेकांना विविध प्रकारचा पास्ता खायला आवडतं. पण तो कुठू आला, त्याचा शोध कोणी लावला यामागची खरी कहाणी लोकांना माहीत नसेल. बरेच लोक पास्ताचा संबंध चीन किंवा मार्को पोलोशी जोडतात, परंतु इतिहास त्याहूनही अधिक मनोरंजक आहे. ही कथा प्राचीन इटली, अरब जग आणि भूमध्यसागरीय व्यापार मार्गांपर्यंत पसरलेली आहे. पास्ताचा शोध कोणत्या देशाने लावला ते जाणून घेऊया. (Photo Credit - Getty Images)

पास्ताला आधुनिक स्वरूप देणारा देश म्हणून इटलीला ओळखले जाते. नूडल्ससारखे पदार्थ इतरत्र अस्तित्वात असले तरी, इटलीमध्येच पास्ता एक मुख्य अन्न म्हणून विकसित झाला.

ऐतिहासिक नोंदी असं दर्शवतात की पाचव्या शतकाच्या आसपास अरब लोक वाळलेला, सुकलेला पास्ता बनवत असत. नवव्या शतकात जेव्हा अरब शासक सिसिलीमध्ये आले तेव्हा त्यांनी वाळलेला पास्ता बनवण्याच्या तंत्रांची ओळख करून दिली, ज्या नंतर इटालियन लोकांनी त्यात सुधारणा केल्या.

13 व्या शतकात मार्को पोलोने चीनमधून पास्ता आणला ही लोकप्रिय कथा बऱ्याच प्रमाणात काल्पनिक आहे. मार्को पोलो आशियातून परतण्यापूर्वी इटालियन लोक पास्ता खात होते याची कागदपत्रांवरून पुष्टी मिळते. ज्यामुळे ही कथा खरं नव्हे तर दंतकथा बनली.

इ.स.पूर्व चौथ्या शतकातील एट्रस्कन थडग्यांमधून मिळालेल्या पुरातत्वीय निष्कर्षांवरून पास्ता बनवण्याच्या साधनांसारख्या वस्तूंचे कोरीव काम दिसून येते.

17 व्या शतकात नेपल्स हे मोठ्या प्रमाणात पास्ता उत्पादनाचे केंद्र होते. खरंतर पास्ता हा स्वस्त, पोटभर आणि टिकाऊ पदार्थ होता, ज्यामुळे तो स्थानिक कामगार वर्गासाठी परिपूर्ण अन्न ठरायचा. त्यामुळे त्याची लोकप्रियाता वाढू लागली.

इटालियन लोक युरोप आणि अमेरिकेत स्थलांतरित होत असताना, पास्ता त्यांच्यासोबत सगळीकडे पसरला. कालांतराने, पास्ता हा इटालियन पाककृतीचे जागतिक प्रतीक बनला.