
Gold And Silver Price Today: जळगावच्या सराफा बाजारात चांदीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले . गुरुवारी चांदीच्या किंमती स्थिर होत्या. त्यात कोणताही बदल झाला नाही. पण त्यानंतर चांदीने तुफान घोडदौड केली. चांदीत तुफान आले. सुवर्णनगरीत एक किलो चांदीचा भाव थेट अडीच लाखांच्या घरात पोहचला. तर आता चांदी नवीन वर्षात तीन लाखांचा टप्पा गाठते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली. चांदीच्या दराने अडीच लाखांचा आकडा ओलांडला. चांदीच्या दरात तब्बल 20 हजार रुपयांची वाढ झाली.चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 57 हजार 500 रुपयांवर पोहचले. त्यामुळे अनेक जण चांदी खरेदी करण्यासाठी नाही तर घरातील जुनी चांदी मोडण्यासाठी आणि चांदीची भांडी मोड देण्यासाठी पसंती देत आहेत.

गुरुवारी चांदीचा भाव स्थिर होता. त्यानंतर शुक्रवारी चांदी 10 हजार 500 रुपयांनी वधारली. त्यामुळे चांदी 2 लाख 32 हजार 500 रुपयांच्या घरात पोहचली. तर आज सकाळी त्यात पुन्हा मोठी वाढ झाली. चांदी थेट 20 हजारांनी महागली. त्यामुळे ग्राहकांचे डोळे फिरले. चांदी सोन्यावाणी चमकत असल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

गेल्या दोन महिन्यांचा विचार करता एक किलो चांदीत जवळपास 70 हजार रुपयांची वाढ झाली आहे. 13 ऑक्टोबर 2025 रोजी एक किलो चांदीचा भाव हा 1,80,000 रुपये होता. तर 29 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव 1,74,000 रुपये होता. या डिसेंबर महिन्यात चांदीने मोठा गेम केला. 10 डिसेंबर रोजी चांदीचा भाव 1,88,000 रुपये इतका होता. तर आज चांदी अडीच लाखांच्या घरात पोहचली आहे.

दुसरीकडे सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 600 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. जळगावच्या सराफा बाजारात सोने सुद्धा भाव खाऊन गेले. सोने जीएसटीसह 1 लाख 43 हजार 376 रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे सोने नवीन वर्षात दीड लाखांच्या घरात पोहचणार अशी चर्चा सुरू आहे. लवकरच सोन्याच्या दरवाढीचे चित्रही समोर येईल.

डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण, चीन आणि अमेरिकेतली ट्रेडवॉर, भारत आणि अमेरिकेतील ताणलेले व्यापारी संबंध, रशिया-युक्रेन युद्ध आणि चांदीची औद्योगिक विश्वात वाढलेली मागणी यामुळे चांदीच्या किंमती चढ्याच राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सोने-चांदी, जस्त पाठोपाठ तांब्याच्या किंमती पण वाढत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार तिकडे वळाले आहेत.