
गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठे-चढउतार पाहायला मिळत आहेत. नव्या वर्षात सोन्याचा भाव आणखी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु या अंदाजांना चुकीचे ठरवत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव घसरला आहे. सोन्यासोबतच चांदीचा भावही खाली आला आहे.

नव्या वर्षाच्या म्हणजेच 2026 सालाच्या पहिल्याच दिवशी चांदी आणि सोन्याच्या भावात साधारण घसरण झाली आहे. आज म्हणजेच 1 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,33,151 रुपयांपर्यंत कमी झाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनने दिलेल्या माहितीनुसार 2025 सालाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,22,007 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये होता.

आज हाच 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 जानेवारी रोजी 1,21,966 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांपर्यंत खाली आला आहे. चांदीच्या भावात 2500 रुपयांपेक्षाही जास्त घसरण झाली आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी चांदीचा भाव वाढला होता. त्यामुळे आता नव्या वर्षात सोने तसेच चांदीचा भाव वाढणार की कमी होणार? असे विचारले जात आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनतर्फे जारी केल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीच्या भावात जीएसटी तसेच घडणावळीची फी ग्राह्य धरलेली नसते. त्यामुळे स्थानिक पातळीवर तुम्ही सोने खरेदी करायला गेल्यास सोन्याची किंमत जास्त होतो. म्हणूनच तुम्ही सोने खरेदी करायला गेल्यास सर्व गोष्टी विचारूनच पैसे गुंतवा.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)