Gold Rate : सोन्याचा भाव धडाम आपटला, मोदींच्या आवाहनानंतर मोठी घसरण; जाणून घ्या नवा भाव काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदी करू नये, असे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनानंतर सोन्याचा भाव घसरला आहे. आता 24 कॅरेट सोन्याचा भाव नेमका किती झाला आहे, ते जाणून घेऊ या....

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारताला बसत असलेला फटका आणि त्यातून होणारी हानी लक्षात घेता जनतेला मोठे आवाहन केले आहे. भारताची स्थिती सुधारावी यासाठी जनतेने पुढच्या एक वर्षात सोनं खरेदी करू नये, असे मोदी म्हणाले आहेत.

त्यांच्या या आवाहनानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सोन्याच्या दागिन्यांचा व्यापार करणाऱ्यांनी या आवाहनाला विरोध केला आहे. देशभरातील तीन कोटी कारागिरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, असे सोन्याचे व्यापारी म्हणत आहेत.

दुसरीकडे मोदींच्या या आवाहनानंतर सराफा बाजारात मोठा चढउतार पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव कमी होताना दिसत आहे. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर आता सोमवारी बाजारात सोन्याची पडझड पाहायला मिळाली.

गुड रिटर्न्स या सोने, चांदीचा भाव तसेच अर्थविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळानुसार एका ग्रॅमची किंमत 22 रुपयांनी कमी झाली आहे. 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 15,213 रुपये झाली आहे. 8 ग्रॅम सोन्याची किंमत 1,21,704 रुपये झाली आहे.

एक तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 1,52,130 रुपये झाली आहे. म्हणजेच एक तोळा सोन्याबाबत बोलायचे झाल्यास सोनं 220 रुपयांनी कमी झालं आहे. त्यामुळे भविष्यातही सोन्याचा भाव असाच कमी होणार का? असे विचारले जात आहे.