
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा दर चांगलाच वाढत आहे. हे दोन्ही मौल्यवान धातू वेगवेगळ्या कारणांमुळे चांगलेच चकाकताना दिसत आहेत. दरम्यान, आता चांदीचा भाव धाडकन खाली घसरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चांदी तब्बल 21 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

देशातील वायदा बाजार मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर काही तासांतच सोन्याचा भाव 21 हजार रुपयांनी घसरला आहे. सकाळी बाजार चालू झाल्यानंतर काही मिनिटांत चांदीचा भाव 14 हजार रुपयांनी वाढला होता. त्यानंतर हा भाव 2.50 लाख रुपये प्रति किलोच्याही पुढे जाऊन नवा उच्चांक स्थापित झाला होता.

चांदीने नवा उच्चांक गाठल्यानंतर मात्र लोकांनी विक्रीला सुरुवात केली. परिणामी चांदीचा भाव साधारण 21 हजार रुपयांपर्यंत खाली आला. प्रॉफिट बुकिंच्या मानसिकतेमुळे चांदीमध्ये घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. सोबतच सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे तणाव निवळण्याची शक्यता लक्षात घेता चांदीचा भावही घसरला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरील आकड्यांनुसार चांदी भाव आपल्या सार्वकालिक उच्चांकवरून 8.28 टक्क्यांनी घसरला आहे. म्हणजेच बाजार चालू झाल्यानंतर फक्त तीन तासांत चांदीचा भाव तब्बल 21 हजार रुपयांनी कमी झाला आहे.

सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी चांदीचा भाव 2,54,174 रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर साधारण 12 वाजून 20 मिनिटांनी चांदीच्या भावात 21,054 रुपयांची घसरण झाली. या घसरणीसह चांदीचा भाव 2,33,120 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला. दुपारी 1 वाजून 55 मिनिटांपर्यंत चांदीचा भाव 2,37,153 रुपये प्रति किलोवर पोहोचला होता.