
मलंगगडावरील बहुप्रतिक्षित फ्युनिक्युलर ट्रेनचे उद्घाटन आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांनी केले आहे. या फ्युनिक्युलर ट्रेनमुळे मलंगगडावर जाण्यासाठी लागणारा 2 तासांचा पायी प्रवास आता अवघ्या 7 मिनिटांवर आला आहे. या ट्रेनमुळे मलंगगडावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होईल तसच इथल्या पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

कल्याणजवळचे मलंगगड हे ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. येथे हिंदू-मुस्लिम भाविक दोन्ही दर्शनाला येत असतात. सह्याद्रीच्या डोंगररांगेत असलेल्या मलंगगडावर जाण्यासाठी भाविकांना 2 तासांची पायपीट करावी लागते.

अंबरनाथचे तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी स्विर्त्झलँडच्या धर्तीवर याठिकाणी फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव मंजूर करवून घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने सप्तशृंगी वणीगड आणि मलंगगडासाठी फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव मंजूर केल्यांनतर प्रत्यक्ष कामही सुरू झाले होते.

मात्र वणी गडावरील रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतरही मलंगगडाचा प्रकल्प अनेक दिवस रखडला होता. मात्र बऱ्याच अडथळ्यानंतर अखेर मंलगगडावरील रेल्वेसेवाही सुरू झाली आहे.

मलंगगड ट्रेन मार्गिकेवर 2 ट्रेन धावणार असून एका ट्रेनला दोन प्रशस्त डबे आहेत.त्यातून दर तासाला सुमारे 1200 प्रवासी प्रवास करू शकतील. भाविकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ही सेवा 24 x 7 तास देण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर रोपवेज कंपनीच्या व्यवस्थापनाने दिली आहे.या फ्युनिक्युलर ट्रेनसाठी एकूण 70 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.