
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढते वजन ही अनेकांसाठी एक गंभीर समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच उत्तम आहार असणे गरजेचे असते. प्रथिनांचा स्रोत म्हणून मांसाहारी आहारात चिकन आणि मासे या दोघांनाही विशेष महत्त्व आहे.

मात्र, या दोघांपैकी वजन कमी करण्यासाठी नक्की काय खावे, याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. आहारतज्ज्ञांच्या मते, हे दोन्ही घटक प्रथिनांचे (Protein) उत्तम स्रोत असले, तरी वजन घटवण्याच्या प्रक्रियेत त्यांचे परिणाम वेगवेगळे असू शकतात.

जर तुमचे उद्दिष्ट केवळ वजन कमी करणे असेल, तर तुम्ही मासे खाण्याला पहिली पसंती द्यायला हवी. माशांमध्ये प्रामुख्याने ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते. हे फॅटी ॲसिड शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास आणि मेटाबॉलिझ्म सुधारण्यास मदत करते.

चिकनच्या तुलनेत माशांमध्ये कॅलरीज कमी असतात. ते पचायला अत्यंत हलके असतात. पांढरे मासे किंवा ग्रिल्ड मासे आहारात समाविष्ट केल्यास पोटाचा घेर कमी होण्यास लवकर मदत होते.

तर दुसरीकडे जे लोक जिममध्ये व्यायाम करतात किंवा ज्यांना स्नायूंची (Muscles) वाढ करायची आहे, त्यांच्यासाठी चिकन ब्रेस्ट हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत आहे. चिकनमध्ये माशांपेक्षा अधिक प्रमाणात प्रथिने असतात.

यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. तसेच अवेळी लागणारी भूक नियंत्रणात राहते. मात्र, चिकन खाताना ते चिकन ब्रेस्ट असलेल्या भागातले असावे. कारण इतर भागात फॅट्सचे प्रमाण जास्त असते.

तज्ज्ञांच्या मते, तुम्ही चिकन खाता की मासे, यापेक्षा ते कसे शिजवता हे अधिक महत्त्वाचे असते. तुम्ही जर हे पदार्थ तेलात तळून खाल्ले, तर त्यातील कॅलरीजचे प्रमाण दुप्पटीने वाढते. ज्यामुळे वजन घटण्याऐवजी वाढू शकते.

वजन कमी करण्यासाठी हे पदार्थ वाफवून, ग्रील्ड करून किंवा कमीत कमी तेलात रस्सा करून खाणे चांगले ठरते. थोडक्यात सांगायचे तर, जर तुम्हाला वेगाने वजन घटवायचे असेल तर मासे हा एक उत्तम पर्याय आहे. पण शरीरात ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि स्नायूंच्या बांधणीसाठी चिकन ब्रेस्टचा समावेश करणेही फायदेशीर ठरते.