सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विहीर, बाबासाहेब प्यायले होते चांदीच्या वाटीतून पाणी !
देशाच्या संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आज त्यांच्या आठवणींना आणि कार्याला उजाळा दिला जात आहे. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या होत्या, त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात जयंती साजरी होत आहे. आज जयंतीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील एक विहीर चर्चेत आली आहे.

महामानव, बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात अत्यंत जल्लोषात साजरी केली जात आहे. जयंती निमित्ताने आज देशभरात ठिकठिकाणी विचारांचा उत्सव साजरा होत आहे. बाबासाहेबांच्या कार्याचं स्मरण केलं जात असून देशासाठीच्या त्यांच्या योगदानावर भरभरून बोललं जात आहे.

बाबासाहेबांचा लढा केवळ दलितांच्या उद्धारासाठी नव्हता, तर तो समाज घडवण्याचा लढा होता. समाजात समता प्रस्थापित करण्याचा आणि त्यातून देश घडवण्याचा लढा होता. त्यासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य देशाला अर्पण केलं. आज आपण नेशन फर्स्टची चर्चा करतो. पण त्याकाळात 'मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे', असं ठासून सांगणारे बाबासाहेब हे एकमेव युगपुरुष होते.

बाबासाहेबांनी देशात ज्या ज्या ठिकाणी भेट दिली, ती ठिकाणं ऐतिहासिक ठरली आहेत. आजही तिथल्या नागरिकांनी आपल्या लाडक्या युगपुरुषाच्या आठवणी जतन करून ठेवल्या आहेत. सोलापूरच्या अक्कलकोटमधील रहिवाशांनी तर एक विहीरच जतन करून ठेवली आहे.

सोलापूरच्या अक्कलोकट तालुक्यातील वळसंग गावात एक विहीर आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची साक्ष देणारी ही विहीर सरकारकडून संरक्षित करण्यात आली आहे. ही विहीर आजही बाबासाहेबांच्या संघर्षाची साक्ष देत आहे.

24 एप्रिल 1937 साली डॉ. आंबेडकरांनी वळसंग येथील विहिरीतले पाणी रेशीम दोराने काढून चांदीच्या वाटीतून प्राशन केले होते.

गावात स्पृश्य अस्पृश्यता असल्याने दलितांनी स्वतः ही विहीर खोदली होती. त्यानंतर डॉ. आंबेडकरांच्या हस्ते त्या विहिरीचे उद्घाटन करण्यात आले होते. नंतर सोलापूर जिल्हा लोकल बोर्डाने वळसंग येथील विहीर बांधून दिली होती.

वळसंग येथील या ऐतिहासिक क्षणावरून विहिरीला 'आंबेडकर बावड' असं नाव देण्यात आलं होतं. 1937 मध्ये बाबासाहेबांनी सोलापुरातील प्रचाराच्या वेळेस वळसंग येथील ऐतिहासिक विहिरीला भेट दिली होती.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार ऐदाळे यांच्या प्रचारासाठी डॉ. आंबेडकर यांनी 3 हजारहून अधिक लोकांसह वळसंग येथील विहिरीला भेट दिली होती. तेव्हा स्थानिकांनी बाबासाहेबांना पाणी उपसण्यासाठी आग्रह धरला होता. वळसंग येथील 'आंबेडकर बावड' ऐतिहासिक असल्याने आजही आंबेडकरी जनता या ठिकाणाला भेट देते.