
अनेक जण पैसा असताना पण गृहकर्ज घेतात, तेव्हा इतर बुचकाळ्यात पडतात. पैसा असताना व्याजाचा हप्ता कशाला फेडतो, असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. पण गृहकर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत. कोणते आहेत ते फायदे, जाणून घ्या...

गृहकर्ज घेतल्याचा पहिला फायदा म्हणजे, जी मालमत्ता खरेदी केली आहे, ती विवादित नाही. बँका, वित्तीय संस्था कर्ज देण्यापूर्वी ती मालमत्ता विवादीत तर नाही ना, तिच्यावर इतर कर्ज, काही घोळ तर नाही ना हे तपासतात मग कर्ज देतात. त्यासंबंधीची कागदपत्र तपासतात.

गृहकर्जाचा आयकर भरताना सर्वात मोठा फायदा होतो. गृहकर्जामुळे करदात्यांना कर वाचवता येतो. आयकर अधिनियमाच्या कलम 24(b) अंतर्गत व्याजदरावर प्रत्येक आर्थिक वर्षात 2 लाख रुपयांची सवलत मिळते. कलम 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते.


इतर कर्जापेक्षा गृहकर्जावरील व्याजदर स्वस्त असतो. भविष्यात महागाईचे प्रमाण कमी आले तर गृहकर्जावरील व्याजदर पण कमी होईल. त्याचा गृह खरेदीदारांना मोठा फायदा होईल. वाचलेला पैसा बचत अथवा निवृत्ती निधीसाठी त्याची तरतूद करता येते.

गृहकर्जावर टॉप-अप देण्यात येते. जुने घर खरेदी केले तर त्याच्या अंतर्गत डागडुजीवर जास्त पैसा खर्च येतो. इंटिरिअरसाठी पण रक्कम लागते. होम लोनवर टॉप अप केले तर त्यावरील व्याजदर पण कमी असते.