
तुम्ही अनेकदा अमुक व्यक्तीच्या घरावर प्राप्तिकर विभागाची धाड पडल्याचे ऐकले असेल. अशा धाडींमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्याचे फोटोही तुम्ही अनेकदा पाहिले असते. भारतात अशा घटना नव्या नाहीत. प्राप्तिकर विभागाने याआधी अशा अनेक कारवाया केलेल्या आहेत.

दरम्यान, प्राप्तिकर विभागाची धाड पडण्याची शक्यता असल्यामुळे घरात नेमकी किती रोकड असावी, असा प्रश्न अनेकांना पडतो. घरात रोकड ठेवण्याचा नियम काय आहे? असेही प्रश्न लोक नेहमीच विचारत असतात. याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या.

तसं पाहायचं झालं तर तुम्ही नियमानुसार घरात कितीही पैसे ठेवू शकता. म्हणजेत घरात रोकड ठेवण्याची अशी कोणतीही मर्यादा नाही. पण हे पैसे ठेवताना काही नियम आहेत. त्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

तुम्ही घरात कितीही रुपयांची रोकड ठेवू शकता. मात्र तुमच्याजवळ असलेल्या या कॅश पैशांचा तुम्हाला हिशोब देता येणे गरजेचे आहे. म्हणजेच हे पैसे कुठून आले, या उत्पन्नाचा मार्ग काय? या पश्नांची तुमच्याकडे उत्तरं असली पाहिजेत.

घरात सापडलेली रोख रक्कम ही तुमच्या पगारातून किंवा तुमच्या उद्योगातून मिळालेल्या उत्पन्नाचाच भाग आहे, हे तुम्हाला सिद्ध करता येणं गरजेचं असतं. तुमच्या घरात असलेली रक्कम ही अधिकृत व्यवहाराचाच भाग आहे, हे तुम्हाला दाखवता आले पाहिजे.