Gold: घरात किती सोनं ठेवणं कायदेशीर? मर्यादेपेक्षा जास्त सोनं आढळल्यास काय होणार?

Gold: घरातील लॉकरमध्ये जास्तीत जास्त किती ग्रॅम सोनं ठेवता येतं, असा प्रश्न अनेकांना पडतो. 500 ग्रॅमपेक्षा जास्त सोनं बाळगल्यास आयकर विभाग कारवाई करू शकतो का, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर, सविस्तर त्याविषयी जाणून घ्या..

| Updated on: Nov 14, 2026 | 1:04 PM
1 / 11
Gold: भारतात सोनं हे केवळ दागिन्यांपुरतं मर्यादित नसून अनेक कुटुंबांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचं साधन आहे. लग्न, सण-समारंभ किंवा पिढ्यानपिढ्या मिळालेल्या वारशातून अनेकांकडे सोन्याचे दागिने जमा होतात. मात्र, घरात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. 500 ग्रॅमपेक्षा जास्त सोनं ठेवल्यास आयकर विभाग कारवाई करू शकतो का, असाही प्रश्न पडतो. प्रत्यक्षात भारतात सोनं बाळगण्याची कोणतीही कमाल कायदेशीर मर्यादा नाही. मात्र, त्याचा स्रोत स्पष्ट करता येणं महत्त्वाचं आहे.

Gold: भारतात सोनं हे केवळ दागिन्यांपुरतं मर्यादित नसून अनेक कुटुंबांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचं साधन आहे. लग्न, सण-समारंभ किंवा पिढ्यानपिढ्या मिळालेल्या वारशातून अनेकांकडे सोन्याचे दागिने जमा होतात. मात्र, घरात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. 500 ग्रॅमपेक्षा जास्त सोनं ठेवल्यास आयकर विभाग कारवाई करू शकतो का, असाही प्रश्न पडतो. प्रत्यक्षात भारतात सोनं बाळगण्याची कोणतीही कमाल कायदेशीर मर्यादा नाही. मात्र, त्याचा स्रोत स्पष्ट करता येणं महत्त्वाचं आहे.

2 / 11

विवाहित महिलांसाठी 500 ग्रॅम सोन्याचा नियम अनेकांना माहीत आहे. मात्र, ही सोनं बाळगण्याची कायदेशीर मर्यादा नाही. आयकर विभागाच्या तपासणीदरम्यान ठरावीक प्रमाणातील दागिने जप्त न करण्यासाठी हा नियम तयार करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टानेही अलीकडील निर्णयात या दोन्ही गोष्टींमधील फरक स्पष्ट केला आहे. केवळ ठरावीक मर्यादेत सोनं असल्याने त्याचा वैध स्रोत सिद्ध होत नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

3 / 11

हा नियम केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजेच CBDT च्या 11 मे 1994 रोजी जारी झालेल्या Instruction No. 1916 शी संबंधित आहे. आयकर विभागाच्या छापेमारीदरम्यान दागिने जप्त करण्याबाबत या निर्देशांमध्ये मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. त्यानुसार विवाहित महिला 500 ग्रॅम, अविवाहित महिला 250 ग्रॅम आणि कुटुंबातील पुरुष सदस्य 100 ग्रॅम सोन्याचे दागिने जवळ ठेवू शकतात. ही मर्यादा प्रामुख्याने तपासणीदरम्यान दागिने जप्त न करण्यासाठी आहे.

4 / 11

आयकर विभागाकडून एखाद्या कुटुंबाच्या घरी छापेमारी झाल्यास या निर्धारित मर्यादेतील दागिने सामान्यतः जप्त केले जात नाहीत. मात्र, तपासणी करणारा अधिकारी कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती, समाजातील परंपरा आणि इतर बाबी लक्षात घेऊन यापेक्षा अधिक दागिनेही जप्त न करण्याचा निर्णय घेऊ शकतो. याशिवाय, तपासणीदरम्यान सापडलेल्या सर्व दागिन्यांची यादी तयार करणं आवश्यक असतं.

5 / 11

एखाद्या विवाहित महिलेच्या घरात 500 ग्रॅमपेक्षा अधिक सोनं आहे, म्हणून तिच्यावर थेट कारवाई होऊ शकत नाही. भारतात सोनं बाळगण्याची कमाल कायदेशीर मर्यादा नाही. त्यामुळे 500 ग्रॅम, 700 ग्रॅम किंवा त्याहून अधिक सोनं असणं केवळ वजनाच्या आधारावर बेकायदेशीर ठरत नाही. 1 डिसेंबर 2016 रोजी केंद्रीय अर्थ मंत्रालयानेही स्पष्ट केलं होतं की, ज्ञात उत्पन्नातून खरेदी केलेलं किंवा वारशाने मिळालेलं सोनं बाळगण्यावर कोणतीही मर्यादा नाही.

6 / 11

सोन्याच्या मालकीबाबत किंवा त्याच्या स्रोताबाबत तपासात प्रश्न उपस्थित झाल्यास संबंधित व्यक्तीला दागिने कुठून मिळाले, हे स्पष्ट करावं लागू शकतं. अशावेळी सोनं खरेदी केल्याची पावती, बँक व्यवहारांचे पुरावे, वारसाहक्काने मिळालेल्या दागिन्यांची कागदपत्रं आणि भेटवस्तूंच्या नोंदी उपयोगी ठरू शकतात. त्यामुळे सोनं किती आहे यापेक्षा ते कसं मिळवलं आहे, हे स्पष्ट करणं अधिक महत्त्वाचं आहे.

7 / 11

बिहारमधील फूलपरी कुमारी यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला. मे 2015 मध्ये त्यांच्याविरोधात दक्षता विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर जुलै 2020 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलं. 28 जानेवारी 2021 रोजी विशेष दक्षता न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली. मात्र, फूलपरी कुमारी यांनी या कारवाईला पाटणा हायकोर्टात आव्हान दिलं होतं.

8 / 11

फूलपरी कुमारी यांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला होता की, त्यांच्याकडे आणि त्यांच्या अविवाहित मुलीकडे असलेले सोन्याचे दागिने CBDT ने निर्धारित केलेल्या मर्यादेत आहेत. न्यायालयासमोर सादर केलेल्या नोंदीनुसार, दोघींकडे मिळून 646.400 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. आईसाठी 500 ग्रॅम आणि अविवाहित मुलीसाठी 250 ग्रॅम अशी एकूण 750 ग्रॅमची गैर-जप्ती मर्यादा होती. त्यामुळे कारवाई रद्द करावी, अशी त्यांची मागणी होती.

9 / 11

14 मे 2026 रोजी पाटणा हायकोर्टाने फूलपरी कुमारी यांच्यावरील कारवाई रद्द केली होती. मात्र, बिहार सरकारने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. 2 नोव्हेंबर 2026 रोजी न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती अरुण पल्ली यांच्या खंडपीठाने हायकोर्टाचा निर्णय रद्द केला. CBDT च्या नियमांनुसार सोनं जप्त न करण्याची मर्यादा असली तरी त्यामुळे त्याच्या वैध स्रोताचा पुरावा मिळत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

10 / 11

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अर्थ असा नाही की, 500 ग्रॅमपेक्षा जास्त सोनं बाळगणं बेकायदेशीर आहे. त्याचप्रमाणे 500 ग्रॅमच्या आत सोनं असल्यास त्याच्या स्रोताबाबत कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत, असंही नाही. तपासात सोनं कुठून आलं, ते खरेदी केलं की वारशाने मिळालं, याची माहिती द्यावी लागू शकते. महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाने फूलपरी कुमारी यांना दोषी ठरवलेलं नाही. त्यांच्याविरोधातील कायदेशीर प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

11 / 11

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे सोनं बाळगण्याची कोणतीही नवीन मर्यादा लागू झालेली नाही. CBDT चा 1994 मधील नियमही कायम आहे. मात्र, सोन्याच्या वैध स्रोताची कागदपत्रं जपून ठेवणं महत्त्वाचं आहे. सोनं खरेदी केल्यास त्याची बिलं, वारशाने मिळाल्यास संबंधित कागदपत्रं आणि लग्न किंवा इतर समारंभात भेट म्हणून मिळालेल्या दागिन्यांच्या उपलब्ध नोंदी सुरक्षित ठेवाव्यात. भविष्यात आयकर विभागाकडून चौकशी झाल्यास हे पुरावे उपयोगी ठरू शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us