Digital Arrest: डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मोठी फसवणूक, राहा सावध, होऊ नका सावज, काय काळजी घ्याल?
Digital Arrest Scam Alert: गेल्या काही दिवसांपासून डिजिटल अरेस्टच्या घटना पार ग्रामीण भागापर्यंत घडताना दिसत आहेत. सर्वसामान्यांच्या भीतीचे आणि डिजिटल निरक्षरतेचा फायदा घेत ही फसवणूक केली जाते. सायबर खात्याने नागरिकांना राहा सावध, होऊ नका सावज, असा संदेश दिला आहे.

Digital Arrest Scam Alert: डिजिटल युगात फसवणुकीचे आधुनिक सापळ्यात सर्वसामान्यांची लूट करण्यात येत आहे. अत्यंत जहाल आणि खतरनाक योजना आखून नागरिकांना ठगवण्याचे काम सुरू आहे. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तरुणांपासून ते वयोवृद्धांकडून लाखो रुपये उकळल्याच्या घटना केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण पट्ट्यातही वाढल्या आहेत. तपास यंत्रणेचे अधिकारी, पोलीस असल्याचा धाक दाखवत, व्हिडिओ कॉल करून ही फसवणूक करण्यात येते. तुमच्या आधार कार्ड, पॅनकार्डचा वापर करून गैरप्रकार झाल्याचा, मोठा घोटाळा झाल्याचा दावा करत नागरिकांना तुरूंगात टाकण्याची धमकी दिल्या जाते. त्यानंतर एक व्हर्चुअल कोर्टाचा दिखावा करण्यात येते आणि नागरिकांकडून पैसे उकळण्यात येतात. बदनामीपोटी आणि भीतीपोटी अनेक नागरिक या ठगांना बळी पडतात.
देशात कोणतीही कायदेशीर संस्था अथवा पोलीस, तपास यंत्रणा कुणालाही फोन अथवा व्हिडिओ कॉल करून कधीही अटक करू शकत नाही. भारतीय कायद्यात डिजिटल अरेस्ट अशी कोणताही संकल्पनाच नाही. पण फसवणूक करण्यासाठी सायबर भामटे याचा वापर करतात. अगोदर धाक दाखवतात आणि मग पैसे उकळतात. अशा लोकांपासून सावध राहण्याचे आणि तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन सायबर विभागाने केले आहे.
फसवणुकीची धक्कादायक आकडेवारी
भारतीय सायबर विभागाच्या आणि केंद्रीय गृह खात्याच्या अहवालानुसार, सायबर गुन्हेगारीचा परीघ फार मोठा आहे. दोन वर्षांपूर्वी 2024 मध्ये पहिल्या नऊ महिन्यात सायबर ठगांनी देशातील नागरिकांना फसवून 11,333 कोटी रुपये उकळले. याच काळात 12 लाख सायबर तक्रारी नोंदवण्यात आल्या. केवळ डिजिटल अरेस्टच्या 63,000 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात नागरिकांची 1,616 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ऑनलाईन ट्रेडिंग आणि शेअर बाजाराच्या नावाखालील गुंतवणुकीतून जवळपास 3,216 कोटींची लूट करण्यात आली.
अशी होते फसवणूक
सायबर गुन्हेगार भारदस्त आवाजात अगोदर संपर्क साधतात. समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया आणि गोंधळलेल्या मानसिकतेचा फायदा घेतात. अटकेची भीती घालतात. बदनामीची भीती घालतात आणि फसवतात.
लागलीच निर्णय घ्या. नाहीतर तुम्हाला पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही असा धाक दाखवून लागलीच गोत्यात आणतात.
भावनिक दबाव आणि भीती निर्माण करून त्याच व्यक्तीला विविध खात्यात पैसे जमा करायला भाग पाडले जाते
ही बाब कुणालाही सांगू नका असा दबाव आणला जातो. सातत्याने फोन करण्यात येतात.
तातडीने करा हे काम
जर तुम्हाला असा दमदाटी करणारा, फसवणूक करण्याच्या उद्देशाने फोन आला तर सर्वात अगोदर त्याला बळी पडू नका. अगोदर स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा. अथवा तातडीने सायबर विभागाच्या हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क करून घटनेची आणि अनोळखी क्रमांकाची माहिती द्या. अथवा तुम्ही cybercrime.gov.in वर तक्रारही नोंदवू शकता.
