
दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना इंटर आर्ट्सला असताना स्टेट बँकेची नोकरी मिळाली. त्यांचं काम ज्यांनी बघितलं होतं, त्यांच्याविषयी ज्यांनी ऐकलं होतं त्यापैकी कोणीतही बहुधा माझं नाव सुचवलं असावं, असं ते सांगतात. त्यांना कलावंतांच्या कोट्यामध्ये नोकरी मिळाली होती.

अशा प्रकारे अशोक सराफ हे आर्टिस्ट म्हणून बँकेत रुजू झाले. बँकेत अभिनेता म्हणूनच घेतल्याने त्यांना तिथे नाटक आणि एकांकित करायची भरपूर संधी मिळाली होती. त्यावेळी नोकरी मिळाली म्हणून त्यांचे आई-वडील खुश होते आणि अभिनय करायला मिळणार म्हणून अशोक सराफही खुश होते.

त्याकाळी इंटरबँक स्पर्धा खूप गाजायच्या. वेगवेगळ्या बँकांमध्ये काम करणारे अनेक मान्यवर आपापल्या बँकेसाठी नाटकं करायचे. त्यामुळे त्याकाळी अशोक सराफ यांना बऱ्याच एकांकिका आणि नाटकं करता आली होती. त्यावेळी त्यांनी खूप बक्षिसंदेखील मिळवली होती.

अशोक सराफ यांनी सुरुवातीला काही वर्षं डिस्पॅच विभागात आणि मग शेअर्स विभागात काम केलं होतं. सकाळी बँकेत गेल्यावर नाटकवाल्यांना दोन वाजता तालमीसाठी जायची मुभा असायची. बँकेची नोकरी करताना अनेक सहकाऱ्यांनी मला सांभाळून घेतलं, असं अशोक सराफ यांनी त्यांच्या 'मी बहुरुपी' या आत्मचरित्रात नमूद केलंय.

बँकेत नोकरी करताना अशोक सराफ यांना 235 रुपये पगार होता. त्यातले 200 रुपये ते घरी द्यायचे आणि उरलेल्या 35 रुपयांत त्यांचा महिन्याचा खर्च भागवायचे. त्यावेळी थिएटरमध्ये सिनेमे बघायला मिळावेत म्हणून अशोक मामा त्यातही बचत करायचे.