
साड्या म्हणजे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग. प्रत्येक स्त्रीच्या वॉर्डरोबमध्ये त्यांना एक विशेष स्थान असतं. आजकाल, साड्या बाजारात विविध डिझाइन, कापड आणि नमुन्यांमध्ये सहज उपलब्ध आहेत. ( All Photo Credit Source: Social Media)

साड्या, विशेषतः महागड्या आणि भरजरी काम केलेल्या महागड्या साड्या, महिलांसाठी अभिमानाची बाब असतात. पण अशा साड्या नेसणे जितके खास असते, तितकीच त्यांची काळजी घेणेही महत्त्वाचे ठरते.

अनेकदा असं होतं की, महागडी साडी काही काळानंतर जुनी दिसू लागते. तिचा रंग फिका पडतो, किंवा कापड विरू लागतं, काठांची चमक कमी होते. या समस्या टाळण्यासाठी साडीची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

यासाठी सर्वप्रथम, तुम्ही साडी कशी स्टोअर करता, कशी ठेवता याकडे लक्ष दिले पाहिजे. साडी नेहमी कोरड्या आणि थंड जागी ठेवाव्यात. प्लास्टिकमध्ये त्या बंद करून ठेवल्याने त्यात ओलावा निर्माण होऊ शकतो, म्हणून साडी सुती किंवा मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवणे चांगले. यामुळे साडीची चमक आणि गुणवत्ता दीर्घकाळ टिकून राहते.

दुसरे म्हणजे, साडी वारंवार धुणं टाळावं. रेशमी आणि भरजरी भरतकाम केलेल्या साड्यांसाठी हे विशेष महत्त्वाचं. जास्त धुतल्याने कापड विरू शकतं. गरज असेल तेव्हाच साडी ड्राय क्लीन करून घेणे उत्तम.

साडीला इस्त्री करतानाही काळजी घेणं महत्त्वाचं असतं. कारण जास्त तापमान ठेवून इस्त्री केल्यास कापड आणि भरतकाम दोन्ही खराब होऊ शकतात. त्यामुळे, साडीवर नेहमी एक पातळ कापड ठेवूनच इस्त्री करा.

साडीची बराच काळ एकाच प्रकारे घडी घालून ठेवल्याने कापडावर रेषा पडू शकतात. त्यामुळे, वेळोवेळी साडीच्या घड्या बदलल्या पाहिजेत. यामुळे साडीचे कापड मजबूत राहते आणि तिचा आकार टिकून राहतो.

शेवटी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साडीवर अत्तर किंवा डिओरफ्युम थेट फवारू नका. त्यातील रसायनांमुळे साडीचा रंग आणि चमक खराब होऊ शकते. आधी अत्तर लावून मग साडी नेसणे अधिक चांगले.

या सोप्या टिप्सचा अवलंब करून, तुम्ही तुमची महागडी साडी येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत नव्यासारखी ठेवू शकता. योग्य काळजी घेतल्याने तुमच्या आवडत्या वस्त्राचे सौंदर्य आणि मूल्य दोन्ही टिकून राहते.