Broken Chair : तुटलेली खुर्ची जोडण्याची एकदम सोपी ट्रिक, दोन वस्तू असल्या की टेन्शनच मिटलं!

घरात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या खुर्च्या अनेकदा एखाद्या भागातून तुटतात. अशा वेळी अनेकजण त्या भंगारात देतात किंवा फेकून देतात. मात्र, काही सोप्या पद्धतींचा वापर करून खुर्चीची दुरुस्ती करता येऊ शकते.
खुर्ची ज्या ठिकाणी तुटली आहे, तो भाग आधी स्वच्छ करून घ्या. त्यानंतर मजबूत प्लास्टिक रिपेअरिंग अॅडहेसिव्ह किंवा योग्य गोंद लावून दोन्ही तुकडे एकमेकांना व्यवस्थित जोडा. गोंद पूर्णपणे सुकण्यासाठी काही वेळ द्या.
केवळ गोंद लावल्याने खुर्चीची दुरुस्ती जास्त काळ टिकेलच असे नाही. त्यामुळे तुटलेल्या भागाला अतिरिक्त मजबुती देण्यासाठी तांब्याच्या वायरचा वापर करता येतो. जुन्या विजेच्या वायरमधील तांब्याची तार यासाठी उपयोगी पडू शकते.
तुटलेल्या भागाच्या दोन्ही बाजूंना समान अंतरावर छोटी छिद्रे करा. त्यानंतर या छिद्रांमधून तांब्याची वायर शिवल्याप्रमाणे ओवून घ्या. वायर व्यवस्थित घट्ट केल्याने तुटलेल्या भागाला आधार मिळू शकतो. वायर लावल्यानंतर त्या भागावर प्लास्टिक फिलर, पुट्टी किंवा योग्य रिपेअरिंग कंपाउंडचा थर लावा.
यामुळे वायर आणि छिद्रे झाकली जातील. शेवटी खुर्चीच्या रंगाशी मिळताजुळता पेंट लावून तिला चांगला लूक देता येईल. मात्र, अशा प्रकारे दुरुस्त केलेली खुर्ची बसण्यासाठी सुरक्षित असेलच असे नाही. त्यामुळे तीव्र भार देण्यापूर्वी तिची मजबुती तपासा; खुर्ची तुटण्याची शक्यता असेल तर खुर्ची वापरणे टाळा.