
भारतात अब्जाधीशांचे जग हे तरुण, नवीन विचार आणि अनुभवी उद्योजकांचे मिश्रण आहे. झेप्टोचे संस्थापक कैवल्य व्होरा यांच्यापासून ते रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यापर्यंत अनेक लोकांनी प्रचंड पैसा, संपत्ती मिळवली.

पण तुम्हाला माहितीये का, भारतातील या अब्जाधीशांनी शिक्षणाचे वेगवेगळे टप्पे पार केले आहेत. यात उच्चशिक्षण घेतलेल्यांपासून ते कॉलेज अर्धवट सोडलेल्या अब्जाधीशांचा समावेश आहे.

मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए (MBA) सुरू केले, पण वडिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी ते शिक्षण सोडून दिले.

गौतम अदानी यांनी अहमदाबादमध्ये शिक्षण घेतले. पण वयाच्या १६ व्या वर्षी शाळा सोडली. गुजरात विद्यापीठात कॉमर्स शाखेचा अभ्यास सुरू केला. पण बिझनेसच्या संधीसाठी दुसऱ्याच वर्षी शिक्षण सोडले.

रोशनी नादर मल्होत्रा यांनी अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून कम्युनिकेशनमध्ये बॅचलर पदवी आणि केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए पूर्ण केले. त्यांना शिक्षणात त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

सायरस एस. पूनावाला यांनी पुण्यातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC) मधून पदवी घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएचडी केली आहे. यासोबतच लस निर्मिती आणि समाजसेवेतील योगदानाबद्दल त्यांना ऑक्सफर्ड आणि मॅसॅच्युसेट्स विद्यापीठांकडून मानद (ऑनोररी) पदव्या मिळाल्या आहेत.

कुमार मंगलम बिर्ला यांनी मुंबईतून पदवी घेतली. त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केले. ते चार्टर्ड अकाउंटंट (CA) देखील आहेत आणि लंडन बिझनेस स्कूलचे मानद फेलो आहेत.

नीरज बजाज यांनी मुंबईतून वाणिज्य (कॉमर्स) पदवी घेतली आणि बोस्टन येथील हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केले.

दिलीप संघवी यांनी कोलकत्ता विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली.

अझीम प्रेमजी यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवली.

शाश्वत नाकराणी यांनी आयआयटी दिल्लीतून टेक्सटाइल टेक्नॉलॉजीची पदवी घेतली, पण वयाच्या १९ व्या वर्षी भारतपेची स्थापना केली.

अरविंद श्रीनिवास यांनी आयआयटी मद्रासमधून अभियांत्रिकीची दुहेरी पदवी घेतली. त्यानंतर यूसी बर्कले येथून संगणक विज्ञानात पीएचडी पूर्ण केली. त्यांना चेन्नई बॉय म्हणून ओळखले जाते.

कैवल्य वोहराचा जन्म २००१ मध्ये झाला. त्याने मुंबईत संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू केले आणि नंतर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात संगणक शास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी गेला. पण बिझनेस करण्याच्या उद्देषाने त्याने कॉलेज सोडले.

वयाच्या १९ व्या वर्षी त्याची आदित पालिचासोबत मैत्री झाली आणि त्या दोघांनी झेप्टोची स्थापना केली. या दोघांनीही स्टॅनफोर्ड विद्यापीठात संगणक शास्त्राचा अभ्यास सुरू केला होता, पण व्यवसाय सुरू करण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडले.