
इंडिगो एअरलाईनने आपल्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. सध्या इंडिगो एअरलाईन्सचे देशभरात उड्डाणे रद्द होणे, उशिरा होणे किंवा वेळापत्रक बदलणे यांसारख्या समस्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. यावर उपाय म्हणून इंडिगोने तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना संपूर्ण पैसे परत देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे जर तुमची इंडिगो फ्लाइट उशिरा झाली असेल, रद्द झाली असेल किंवा तिचे वेळापत्रक बदलले असेल, तर तुम्ही कोणतेही शुल्क न भरता तुमचे तिकीट रद्द करू शकता आणि तिकिटाचे संपूर्ण पैसे परत मिळवू शकता.

मात्र इंडिगोच्या विमानाचे तिकीट कसे रद्द करावे, याची माहिती आता समोर आली आहे. तुम्हाला तुमचे तिकीट रद्द करणे आता खूप सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला कोणालाही फोन करण्याची गरजही लागणार नाही. फक्त पाच स्टेप्समध्ये तुम्हाला तिकीट रद्द करता येणार आहे.

तुमच्या मोबाईलवर इंडिगो अॅप किंवा संगणकावर goindigo.in ही अधिकृत वेबसाइट उघडा. यानंतर Home Page वर Manage Bookings हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

यानंतर तुमचा पीएनआर (PNR) क्रमांक आणि तुमच्या तिकिटावर असलेले आडनाव (Last Name) एंटर करा. त्यानंतर सर्चवर क्लिक करा. तुमच्या फ्लाइटची माहिती (Details) समोर आल्यावर, तुम्हाला बुकिंग रद्द करा (Cancel Booking) हे बटण दिसेल. त्यावर क्लिक करा.

शेवटी, तुमच्या निर्णयाची खात्री करण्यासाठी 'रद्दीकरणाची पुष्टी करा' (Confirm Cancellation) यावर क्लिक करा. यानंतर तुमचे तिकीट कॅन्सल होईल. तुमच्या परतफेडीची प्रक्रिया आपोआप सुरू होईल.

तुम्ही १५ डिसेंबरपर्यंत तिकीट रद्द केल्यास तुम्हाला संपूर्ण तिकिटाची रक्कम आणि सर्व कर परत मिळणार आहेत. हे पैसे तुम्ही बुकिंगसाठी वापरलेल्या बँक खाते किंवा वॉलेटमध्ये जमा केले जातील.

जर तुम्हाला तिकीट रद्द करायचे नसेल तर इंडिगो कोणतेही शुल्क न घेता तुमच्या फ्लाईटची तारीख किंवा वेळ मोफत बदलण्याची संधीही देत आहे.