
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 2025 क्वालिफायर-2 सामन्यात पंजाब किंग्जने (PBKS) मुंबई इंडियन्सचा (एमआय) पाच गडी राखून पराभव केला.

या विजयासह पंजाब किंग्जने आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून तिथे त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी (RCB) होणार आहे.

आयपीएलचा अंतिम सामना 3 जून रोजी संध्याकाळी 7.30 वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. क्वालिफायर 2 च्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या खूप निराश आणि हताश झाल्याचं पहायला मिळालं.

मॅच संपल्यानंतर हार्दिक अक्षरश: गुडघ्यांवर मैदानात बसला होता. पराभवाने तो पूर्ण खचला होता. त्यावेळी जसप्रीत बुमराहने हार्दिकला उभं राहण्यास मदत केली. तर मार्कस स्टोइनिसनेही पांड्याचं सांत्वन केलं.

1 जून रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जला 204 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पंजाब किंग्जने हे लक्ष्य एक षटक शिल्लक असताना पूर्ण केलं. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद 87 धावा केल्या.