
हल्ली बहुतांश घरात पाळीव कुत्रा पाहायला मिळतो. काहीजण हौस म्हणून, तर काही एकटेपणा कमी व्हावा यासाठी कुत्रा पाळतात. त्याची कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतात. पाळीव कुत्रा घरात असणे हे अनेक अर्थाने फायद्याचे ठरते. मात्र तितकेच ते वाईटही समजले जाते.

काहींना कुत्रे पाळण्याची प्रचंड इच्छा असते. मात्र त्याच्याबद्दल असणारी भीती आणि नकारात्मक दृष्टीकोन यामुळे कुत्र्यापासून दूर राहतात. अशा परिस्थितीत कुत्रा पाळण्याबाबत ज्योतिषशास्त्र आणि धर्म काय सांगतो, हे आपण जाणून घेणार आहोत.

ज्योतिषशास्त्रानुसार कुत्रा पाळणे हे फायद्याचे आणि नुकसानदायकही ठरू शकते. हिंदू धर्मात कुत्र्याला यमदूत मानले जाते. त्यामुळे कुत्रा पाळणे चांगले आहे की वाईट याबद्दल काही तर्क वितर्क आहेत.

जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल, तर तुम्ही काळ्या रंगाचा कुत्रा पाळा, असा सल्ला दिला जातो. कारण काळ्या रंगाच्या कुत्र्यावर शनी आणि केतूचा प्रभाव असतो. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. काळ्या रंगाचा कुत्रा पाळल्याने शनिदेवाची कृपा होते.

कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्यास शनी आणि राहू-केतूचे दोष कमी होतात. काळ्या रंगाचा कुत्रा घरात पाळल्याने आर्थिक अडचणी दूर होतात.

काळा किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संतती सुख मिळते. यासोबतच कुत्रे हे लहान मुलांना जीव लावतात. त्यामुळे मुलं एकटे पडत नाही आणि हे मुलांच्या आरोग्यासाठी देखील फायद्याचे मानले जाते.

कुत्रा हा भैरव देवतेचा सेवक मानला जातो. त्यामुळे कुत्र्याला नियमितपणे अन्न दिल्यास भैरव महाराज प्रसन्न होतात. ते सर्व प्रकारच्या संकटांपासून आपले रक्षण करतात, असे समजले जाते.

घरात कुत्रा पाळल्याने आपल्या कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रांवर परिणाम होतो. विशेषतः कुत्रा पाळल्याने कुंडलीतील महत्त्वाच्या ग्रहांवर मोठा प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रात कुत्र्याचा शनि, राहू आणि केतू यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे. कुत्र्याला त्रास दिल्यास किंवा त्याची सेवा केल्यास केतू ग्रहावर सर्वाधिक परिणाम होतो.

ज्या लोकांच्या कुंडलीत केतू ग्रह सकारात्मक असतो, त्यांच्यासाठी कुत्रा पाळणे अत्यंत शुभ मानले जाते. कुत्रा पाळल्याने सकारात्मक परिणाम मिळतात. तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळते.

ज्या लोकांच्या कुंडलीत केतू ग्रह कमजोर किंवा अशुभ स्थितीत असेल, त्यांनी कुत्रा पाळू नये. अन्यथा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यांच्याकडे पैशांची कमतरता, घरात अडचणी येणे, भांडणे वाढणे यांसारख्या नकारात्मक गोष्टी घडू शकतात. ज्यामुळे कुटुंबात अशांतता निर्माण होते.

त्यामुळे, कुत्रा पाळण्यापूर्वी आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम काय असतील, याचा अंदाज तुम्हाला लावता येऊ शकतो.