
अभिनेत्री ईशा केसकरने डिसेंबर 2025 मध्ये 'लक्ष्मीच्या पावलांनी' या लोकप्रिय मालिकेला रामराम केला. या मालिकेतील तिच्या कलाच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत होतं. त्यामुळे तिने अचानक मालिका सोडल्याने चाहते निराश झाले होते. परंतु ईशाच्या चाहत्यांसाठी आता खुशखबर आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेचा एआय टीझरसुद्धा प्रदर्शित करण्यात आला होता. या मालिकेचं नाव 'बाई तुझा आशीर्वाद' असा असून यामध्ये ईशा केसकर मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरू झाली.

मालिकेच्या टीझरमध्ये अभिनेत्रीची झलक दाखवण्यात आली असली तरी तिचा चेहरा समोर आलेला नाही. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये ही अभिनेत्री कोण आहे, याचा अंदाज वर्तवला आहे. नेटकऱ्यांच्या मते ही अभिनेत्री ईशा केसकर आहे. नव्या मालिकेसाठी चाहत्यांनी तिला शुभेच्छा देण्यासही सुरुवात केली.

ही आमची लाडकी कला आहे का, असा प्रश्न एकाने विचारला. तर काहींनी थेट ईशा केसकरला टॅग करत तिचं अभिनंदन केलं. 'हिरोइन ईशा केसकर आहे असं वाटतंय', असं एका युजरने लिहिलं आहे. या चर्चांवर अद्याप ईशाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

डोळ्याला दुखापत झाल्याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचं ईशाने स्पष्ट केलं होतं. जर मी आता डोळ्यासाठी विश्रांती घेतली नाही तर पुढे त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. भविष्यात मला कदाचित डोळ्यावर शस्त्रक्रियाही करावी लागू शकते, असं ती म्हणाली होती.