
'जय जय स्वामी समर्थ' या कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत यंदाचा श्रावणातला पहिला सोमवार, ‘श्रावणी सोमवार विशेष भाग’ सादर होऊन भक्तिभावाने साजरा होणार आहे.

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत आतापर्यंत प्रेक्षकांनी अनेक अतिशय सुंदर सोहळे भव्यतेने पार पडताना पाहिले आहेत. स्वामींचे भक्त अतिशय भक्तीभावाने या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. या सोहळ्यादरम्यान भक्तांनी स्वामींच्या अनेक लीलांची अनुभुती घेतली आहे.

येत्या सोमवारी 5 ऑगस्टला रात्री 8 वाजता साजरा होणारा 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतला श्रावणी सोमवारचा विशेष भाग भक्तांसाठी खूप खास असणार आहे.

स्वामींचे लाडके सेवेकरी बाळप्पा आणि गया अतिशय भक्तीभावाने स्वामींची पूजा करताना दिसणार आहेत. दरम्यान स्वामींवर दुग्धाभिषेक होताना दिसणार आहे. बेलपत्रांनी शास्त्रोक्त पद्धतीने विलोभनीय पूजा होणार आहे. शंकराची सहस्त्र नामं घेत ती स्वामी चरणावर वाहिली जातील.

या संपूर्ण पूजेला स्वामींच्या भक्त उद्धराची अक्कलकोटमधली एक गोष्ट जोडली गेली आहे. महादेवांच्या भेटीची आस बाळगलेल्या गौरीला स्वामींमधल्या शिवतत्वाच्या दिव्य अनुभूतीचा प्रारंभ श्रावणी सोमवार विशेष भागापासून सुरू होणार आहे.