कल्याणात संतापजनक प्रकार! शहराचं सौंदर्य वाढवणाऱ्या ‘टेबेबुइया’ झाडांवर विषप्रयोग?
कल्याण मधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येतेय. माणसांचा एकमेकांवरचा राग किंवा व्यावसायिक स्पर्धा आपण ऐकली आहे पण कल्याणात चक्क निष्पाप झाडांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. कल्याण पश्चिमेतील प्रसिद्ध टेबेबुइया झाडांना अज्ञात नराधमांनी ड्रिल मशीनने छिद्र पाडून, त्यात इंजेक्शनद्वारे विषारी रासायनिक द्रव्य सोडल्याचा धक्कादायक संशय व्यक्त केला जातोय. या प्रकारामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रचंड खळबळ उडाली असून अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

कल्याण शहराच्या सौंदर्यात भर घालणारी आणि वसंत ऋतूत गुलाबी-पिवळ्या फुलांनी रस्ते सुशोभित करणारी 'टेबेबुइया' (Tabebuia) झाडं सध्या मृत्यूच्या छायेत आहेत. कल्याण पश्चिमेतील अतिशय गजबजलेल्या गणपती चौक ते डीबी चौक दरम्यान एका अज्ञात आणि विकृत व्यक्तीने या झाडांवर जीवघेणा विषप्रयोग केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

रस्त्याशेजारी असलेल्या तब्बल 7 ते 8 टेबेबुइया झाडांच्या खोडांना अतिशय चलाखीने ड्रिल मशीनच्या सहाय्याने छिद्रे पाडण्यात आली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, या छिद्रांमधून कोणतं तरी इंजेक्शनसदृश विषारी किंवा रासायनिक द्रव्य झाडांच्या आत इंजेक्ट करण्यात आलं आहे.

जेणेकरून ही झाडे हळूहळू सुकून मरून जातील. व्यावसायिक जाहिराती दिसाव्यात म्हणून किंवा दुकानासमोरील अडथळा दूर करण्यासाठी हा क्रूर प्रकार केला गेला असावा, अशी चर्चा आता परिसरात रंगली आहे. हा प्रकार समोर येताच स्थानिक पर्यावरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला.

तर गणपती चौक ते डीबी चौक दरम्यानच्या टेबेबुइया झाडांना हानी पोहोचवल्याची माहिती पालिकेला मिळताच पालिकेचे पथक तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली यात 7 ते 8 झाडांच्या खोडांना ड्रिल करून त्यात काहीतरी रासायनिक द्रव्य टाकल्याचे प्रथमदर्शनी दिसले.

या नंतर पालिका अधिकाऱ्यांनी या झाडांचा पंचनामा केला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या पंचनामाच्या रिपोर्ट आल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात वृक्ष संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई आणि पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.