
यंदाच्या पावसाळ्यात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यावरील महापालिकेच्या तात्पुरत्या उपायांमुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत. रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती सध्या कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांवर दिसून येत आहे.

त्यातच आता खड्ड्यांनी हैराण झालेल्या कल्याण-डोंबिवलीकरांना आता खड्डे बुजवण्याच्या कामातून निर्माण झालेल्या धुळीच्या भयंकर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ज्यामुळे श्वसनाचे त्रास आणि आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

यंदाच्या अतिवृष्टीमुळे शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठे खड्डे पडले होते. नागरिकांकडून वाढत्या तक्रारी आणि आंदोलने झाल्यानंतर महापालिकेने हे खड्डे बुजवण्यासाठी सिमेंट मिश्रित खडी आणि मातीचा वापर करून तात्पुरती मलमपट्टी केली.

पण पुढील काळात पडलेल्या पावसाने ही मलमपट्टी काही दिवसांतच उखडली आणि रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे झाली. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यामुळे महापालिकेच्या या तात्पुरत्या दुरुस्तीचा गंभीर परिणाम आता दिसू लागला आहे.

खड्ड्यांमध्ये टाकलेली माती आणि खडीचा बारीक चुरा रस्त्यावर आला आहे. वाहनांच्या ये-जा मुळे ही माती उडून मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत आहे. सकाळ असो वा संध्याकाळ, शहराच्या अनेक भागांत रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

या धुळीमुळे रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. दुचाकीस्वारांना नाकावर रुमाल किंवा मास्क बांधल्याशिवाय प्रवास करणे शक्य होत नाही. तसेच दिवसाही अनेक रस्त्यांवर दृश्यमानता कमी होत आहे.

सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. फुफ्फुसांचे आणि श्वसनाचे विकार असणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी ही धूळ अत्यंत धोकादायक ठरत आहे.

सध्या धुळीमुळे दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याकडे आणि सुरक्षिततेकडे तातडीने लक्ष द्यावे. केवळ खड्डे बुजवून थांबू नये, तर रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत. कल्याण-डोंबिवलीकरांना या खड्डे आणि धुळीच्या दुष्टचक्रातून लवकरात लवकर मुक्तता मिळावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी तीव्रपणे केली आहे.