प्रसिद्ध अभिनेत्रीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात साजरा केला वाढदिवस
वाढदिवसानिमित्त या अभिनेत्रीला सरप्राइज देण्यात आलं. तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात नेण्यात आलं. जेव्हा तिच्या डोळ्यांवरील पट्टी काढली, तेव्हा महाराजांना पाहून तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'कमळी'मधील कमळीचा वाढदिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी तारिणी आणि निंगी यांनी एक अनोखं सरप्राईझ प्लॅन केलं. कमळीचे डोळे झाकून तिला महाराष्ट्रातील पाहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात नेलं.

जेव्हा तिचे डोळे उघडले, तेव्हा कमळीचा आनंद तिच्या पाणावलेल्या डोळ्यात व्यक्त झाला. मंदिरात पोहोचल्यावर कमळीने महाराजांचं दर्शन आणि आशिर्वाद घेतला. यावेळी तिने भावनिक होऊन आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त केली. या खास प्रसंगी कमळीने मंदिरात आलेल्या शाळेतील मुलांसमोर भाषण केलं आणि शिवस्तुती म्हणाली.

कमळीने महाराजांच्या शिकवणींना आपल्या दैनंदिन जीवनात अंगिकारावं आणि त्यांच्या मूल्यांचं पालन करावं असं म्हणत मुलांना प्रोत्साहित केलं. या खास दिवसाचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी बंड्या आणि ऋषी सर सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम अधिक संस्मरणीय बनवला.

कमळीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या 'विजया बाबर' हिने या अनुभवाबद्दल सांगितलं की, “मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात प्रथमच भेट देण्याची संधी मिळाली. कमळीच्या भावनेत मिसळून मी ही महाराजांचे आशीर्वाद घेतला. हा माझ्यासाठी एक अद्वितीय अनुभव होता.”

आपली ऐतिहासिक मूल्ये, संस्कार आणि आदर्श जीवन पद्धती आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार करणं किती महत्त्वाचं आहे हे कमळीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालिकेच्या चाहत्यांना एक सुंदर संदेशही दिला. 'कमळी' ही मालिका दररोज रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.