
अभिनेता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय जोडी आहे. 'बिग बॉस'च्या घरात हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि घराबाहेर पडल्यानंतरही त्यांचं नातं टिकून आहे. मात्र गेल्या काही दिवसांत या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं.

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान करण कुंद्राने तेजस्वीसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. तेजस्वी आणि करण यांच्या रोमँटिक व्हेकेशनच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये तेजस्वी आणि करणच्या ब्रेकअपबद्दल लिहिलं गेलं होतं. या पोस्टच्या मते तेजस्वी आणि करणच्या नात्यात गेल्या काही काळापासून तणाव पहायला मिळतोय. तेजस्वीला करणच्या मैत्रिणींशी समस्या असल्याचं म्हटलं गेलं होतं.

या दोघांना त्यांच्या ब्रेकअपची माहिती सोशल मीडियाद्वारे जाहीर करायची नाही, कारण त्यांना त्यावरून अधिक चर्चा नकोय आहे, असंही पोस्टमध्ये म्हटलं गेलं होतं. मात्र अशा अफवा पसरवणाऱ्यांना आता करणने सडेतोड उत्तर दिलं आहे. त्याने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये दोघांचं एकमेकांविषयीचं प्रेम स्पष्ट झळकून येत आहे.

टीव्ही अभिनेता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची भेट ‘बिग बॉस 15’च्या सेटवर झाली. याच शोदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि शो संपल्यानंतरही त्यांचं नातं कायम होतं. या दोघांमधील केमिस्ट्री कमालीची होती आणि रिल-रिअल लाइफमध्ये ती सहज झळकून यायची.