भरत जाधव यांनी केलं ‘कारभारी लयभारी’ फेम अनुष्का-निखिलचं केळवण; उखाण्याची चर्चा
'कारभारी लयभारी' या मालिकेतील प्रसिद्ध जोडी आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी अभिनेते भरत जाधव यांनी निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे यांचं थाटात केळवण केलं. पहा या केळवणाचे खास फोटो..

'कारभारी लयभारी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणची जोडी आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. या दोघांसाठी अभिनेते भरत जाधव आणि सुधीर निंबाळकर यांच्या कुटुंबीयांनी खास केळवणाचं आयोजन केलं होतं.

यावेळी कमलाकर सातपुते, शर्मिला शिंदेही उपस्थित होते. आगामी आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करत पार पडलेल्या या खास भेटीत आनंद, आपुलकी आणि कौटुंबिक स्नेहाची सुंदर झलक पाहायला मिळाली. अनुष्का आणि निखिल हे मालिकेत एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले.

केळवणाच्या कार्यक्रमात निखिल आणि अनुष्का यांनी एकमेकांसाठी उखाणे घेतले. 'लग्नसराई सुरू झाली लवकरच दारी येणार निखिलची वरात.. तू तू मी मी चे पुढील प्रयोग आता होणार आमच्याच घरात', असा भन्नाट उखाणा अनुष्काने निखिलसाठी घेतला.

त्यानंतर निखिलनेही अनुष्कासाठी खास उखाणा घेतला. 'भरत सरांना सांगितलं, मी लग्न करतोय तर सर म्हणाले सही रे सही.. अनुष्का वचन दिले मी तुला कधी होणार नाही तू तू मी मी', असं म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.

अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण येत्या 24 जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. मुंबईतील माजघर या प्रसिद्ध हॉटेलमध्ये या दोघांचं केळवण पार पडलं. सध्या अनुष्का 'वचन दिले तू मला' या मालिकेत भूमिका साकारत आहे. तर निखिल 'ऑल द बेस्ट' या नाटकामुळे चर्चेत आहे.