
कॉमेडियन कृष्णा शाहची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शाह 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून आई बनली. या दोघांना जुळी मुलं झाली. मात्र आई बनण्याचा कश्मीराचा प्रवास काही सोपा नव्हता. एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

"माझ्यासाठी हे सर्व खूप कठीण होतं. कारण मी नैसर्गिकरित्या गरोदर राहू शकत नव्हती. माझी प्रकृती ठीक नव्हती. IVF प्रोसेसदरम्यान माझ्या शरीरावर खूप परिणाम झाला होता", असं तिने सांगितलं.

"गर्भधारणेत मी 14 वेळा अपयशी ठरले होते. IVF इंजेक्शन्समुळे सतत मूड स्विंग्स व्हायचे. माझं वजनही खूप वाढलं होतं. मी खूप त्रस्त झाले होते. माझं वाढलेलं वजन कमी करणंही खूप आव्हानात्मक होतं. कारण ते सर्व नैसर्गिक नव्हतं", अशा शब्दांत कश्मीराने अनुभव सांगितला.

याविषयी ती पुढे म्हणाली, "मी माझं आरोग्य गमावतेय, असं मला डॉक्टर म्हणाले. माझी चिडचिड दिवसेंदिवस वाढत होती. लोकांना असं वाटत होतं की मला माझी फिगर खराब करायची नाही म्हणून मी सरोगसीचा पर्याय निवडला. पण मी माझी फिगरच नाही तर आरोग्यसुद्धा गमावून बसले होते."

बऱ्याच प्रयत्नांनंतर कश्मीरा आणि कृष्णा अभिषेकने सरोगसीचा पर्याय निवडला. सरोगसीच्या माध्यमातून त्यांना जुळी मुलं झाली. रायान आणि कृषांग अशी त्यांनी त्यांच्या मुलांची नावं ठेवली.