
'कौन बनेगा करोडपती'च्या 16 व्या सिझनचा पहिला करोडपती जम्मू-काश्मीरमधील 22 वर्षीय चंद्रप्रकाश ठरला आहे. एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिल्यानंतर चंद्रप्रकाशने सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचंही उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या प्रश्नाचं उत्तर त्याला माहीत नव्हतं.

सोळाव्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसल्याने त्याने हा शो एक कोटी रुपयांवरच सोडून दिला. कारण सात कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या सर्वांत कठीण प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी चंद्रप्रकाशकडे कोणती लाइफलाइनसुद्धा शिल्लक नव्हती.

सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी चंद्रप्रकाशच्या खेळीचं, ज्ञानाचं खूप कौतुक केलं. आयुष्याबद्दलच्या त्याच्या सकारात्मक भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. गेम क्विट केल्यानंतर बिग बींनी चंद्रप्रकाशला 7 कोटींच्या प्रश्नाचं अचूक उत्तर सांगितलं.

7 कोटी रुपयांसाठी विचारला गेलेला प्रश्न- 1587 मध्ये उत्तर अमेरिकेत इंग्रजी पालकांना जन्मलेलं पहिलं मूल कोण होतं, ज्याचं नाव रेकॉर्डवर आहे?

या प्रश्नाच्या उत्तरासाठी दिलेले चार पर्याय- A- व्हर्जिनिया डेयर, B- व्हर्जिनिया हॉल, C- व्हर्जिनिया कॉफी आणि D- व्हर्जिनिया सिंक. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं- व्हर्जिनिया डेयर.