
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचं निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राव यांच्या निधनाने संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यविधीला अनेक मोठमोठे कलाकार पोहोचले आहेत.

कोटा श्रीनिवास राव यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले प्रसिद्ध अभिनेते ब्रह्मानंदमसुद्धा अंत्यदर्शनाला पोहोचले. राव यांचं पार्थिव पाहून ब्रह्मानंदम यांना अश्रू अनावर झाले. ते ढसाढसा रडले. अखेर त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने त्यांना सावरलं.

कोटा श्रीनिवास राव आणि ब्रह्मानंदम यांच्यात खूप चांगली मैत्री होती. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला. ब्रह्मानंदम हे त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखले जातात.

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य अभिनेते पवन कल्याणसुद्धा अंत्यविधीला पोहोचले. कोटा श्रीनिवास राव यांनी त्यांच्या जवळपास चार दशकांच्या कारकिर्दीत तब्बल 750 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. खलनायकी भूमिकांसाठी ते विशेष ओळखले जायचे.

अभिनेते प्रकाश राजसुद्धा अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी यांनीही श्रीनिवास राव यांना श्रद्धांजली वाहिली. कलाकारांशिवाय चाहत्यांनीही बरीच गर्दी केली होती.