
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम' हा चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला थिएटरमध्ये चार आठवडे पूर्ण झाले आहेत. 'धुरंधर' आणि 'बॉर्डर 2' या चित्रपटांच्या लाटेदरम्यानही हा चित्रपट थिएटरमध्ये टिकून आहे.

'क्रांतिज्योती विद्यालय'ने आतापर्यंत 23.26 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर चौथ्या वीकेंडला 2.77 कोटी रुपयांची कमाई झाली. हा चित्रपट जेव्हा चौथ्या आठवड्यात पोहोचला, तेव्हा त्याला 'बॉर्डर 2'कडून टक्कर मिळत होती. तरीही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटाविषयी दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, 'आता हा चित्रपट माझा राहिला नाही. तो सबंध महाराष्ट्राचा झालाय. एक वर्षापासून या चित्रपटासाठी घेतलेली सर्व मेहनत खऱ्या अर्थाने कामी येतेय. तिकीटबारीवरच्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन हा चित्रपट काहीतरी वेगळा परिणाम साधतोय, ज्याचा आनंद सर्वाधिक आहे.'

'मला खात्री आहे की मराठी शाळांची ही गौरवगाथा अजून खूप दूर जाणार आहे. आपल्याला मराठी शाळा जपायची आहे, वाढवायची आहे,' अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. या चित्रपटात अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी, कादंबरी कदम, क्षिती जोग, सचिन खेडेकर, निर्मिती सावंत, हरिश दुधाडे, चिन्मयी सावंत यांच्या भूमिका आहेत.

मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्या वाढल्या पहिजेत आणि मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देणारी व्यवस्था उभी राहायला हवी, हे सांगणारा ‘क्रांतीज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट आहे. यातील कलाकारांच्या दमदार अभिनयकौशल्याचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.