
'शुभ विवाह' फेम अभिनेत्री कृतिका गायकवाड गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं. कृतिकाचं पोट पाहून अनेकांनी असा अंदाज वर्तवला होता. मात्र त्यावर आता कृतिकाने पोस्ट लिहित प्रतिक्रिया दिली आहे. गरोदरपणामुळे नव्हे तर आजारपणामुळे पोट वाढल्याचं तिने सांगितलं आहे.

वाढलेल्या पोटाचे काही फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, 'नाही, मी प्रेग्नंट नाही. युटकीन फायब्रॉइड्समुळे माझं पोट फुगलंय. हे एक प्रकारचं ट्युमर आहे.' कृतिकाच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे.

फायब्रॉइड्स म्हणजे एक मस्क्युलर ट्युमर असतं, जे युटरसच्या वॉलवर वाढतं. मात्र याला कॅन्सर म्हणता येणार नाही. कृतिकाने तिच्या या पोस्टमध्ये याची लक्षणंसुद्धा सांगितली आहेत. या आजारपणामुळे महिलांचं पोट गरोदर असल्यासारखं फुगतं, असं तिने म्हटलंय.

कृतिकाच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी तिला लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या आजारपणाचा स्वीकार करत सोशल मीडियावर त्याबद्दल लिहिण्यासाठी हिंमत लागते, असंही काहींनी म्हटलंय.

कृतिका गायकवाडने टीव्हीवरील विविध मालिका आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. तिने नेबर्स, लाखों है दिलवाले यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. कृतिकाने तिच्या चाहत्यांना नियमित चेकअप करण्याचाही सल्ला दिला आहे.