
नाशिकच्या सातपूर रोड परिसरात बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली. या बिबट्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर या बिबट्याला पकडताना विभागाला मोठी कसरत करावी लागली.

सुरुवातीला बिबट्या एका घरात लपून बसला होता, मात्र नंतर ते दुसरीकडे पळाला, त्यामुळे वन विभागाचे कर्मचारी या बिबट्याच्या मागे धावताना दिसले.

बिबट्याला जाळीच्या मदतीने पकडताना बिबट्याने वन कर्मचाऱ्यांवर हल्लाही केला. यात 3 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बिबट्या पकडण्याचा थरार पाहण्यासाठी अनेक लोक पोहोचले होते, लोक बिबट्या दिसला-दिसला, पकडा-पकडा असं म्हणत होते. या गोंगाटामुळे बिबट्या दूर पळताना दिसला.

शेवटी या बिबट्याला भूल देऊन पकडण्यात आले आहे. त्यानंतर त्याला वन कर्मचाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी नेले आहे. वन विभागाच्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.